ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मध्यरात्रीच्या सुमारास धावत्या बसला भीषण आग !

महाड : वृत्तसंस्था

मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक मंगळवारी रात्री दीड-दोनच्या सुमारास सर्व प्रवासी निद्राधीन असताना अचानक धावत्या बसच्या टावरला आग लागली. एका विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे १९ प्रवाशांसह २२ जणांचे प्राण वाचल्याची घटना घडली. या तरुणाच्या लक्षात येताच त्याने चालकाला त्याची कल्पना दिली. बस थांबवण्यास भाग पाडले आणि बसमध्ये झोपलेल्या प्रवाशांना उठवून खाली उतरवले. तेवढ्यात आगीचा भडका उडाला आणि अवघी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

या विद्यार्थ्यांचे नाव आर्यन भाटकर असे असून, त्याने समयसूचकता दाखवली नसती, तर काय झाले असते, याची कल्पनाही काळजाचे ठोके चुकवणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही प्रवासी बस रत्नागिरी येथील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ‘औदुंबर छाया ट्रॅव्हल्स’ची असून, ती त्यांनी गौरव चव्हाण यांच्याकडून भाडेतत्त्वाने घेतली होती. ती रत्नागिरीहून मुंबईकडे निघाली होती. गाडीत १९ प्रवासी, दोन चालक आणि एक क्लीनर असे २२ जण होते.

आर्यन भाटकर याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीडच्या सुमारास त्यांची बस महाडमधील सावित्री पुलाजवळून चालली होती. बसमधील सर्व प्रवासी झोपलेले होते. आर्यन आणि त्याची बहीण आकांक्षा हे दोघे मुंबईला शिकतात, तेही या बसमधून चालले होते. आकांक्षा झोपलेली होती. आर्यनला प्रवासात झोप येत नसल्याने तो जागाच होता. अचानक त्याला काही तरी जळाल्याचा वास आला. त्याने ओळखले हा टायरचा गंध आहे. त्याचा बर्थ नेमका मागील टायरच्या वरच्याच बाजूला होता. तो अंदाज घेत असतानाच अचानक टायर फुटला. त्याने पेटही घेतला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!