मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटाचे नेते एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चांगलीच जुंपली आहे. जितेंद्र आव्हाड हा अत्यंत घाणेरडा माणूस आहे. केवळ अजित पवार यांच्यावर टीका करत राहणं एवढंच त्यांचे काम आहे, अशी जहरी टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे.
बारामती दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. ”आगामी लोकसभा निवडणुक ही आमची शेवटची निवडणूक आहे, असे सांगून काही लोकं तुम्हाला भावनिक करतील. पण खरंच कधी शेवटची निवडणूक आहे हे मला माहित नाही. परंतु तुम्ही भावनिक होऊ नका”, असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्यांनतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. यावर अजित पवार यांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला असे म्हणत स्पष्टीकरण दिले. तर जितेंद्र आव्हाड यांनी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणत अजित पवारांवर पलटवार केला आहे.
यावरून हसन मुश्रीफ यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “जितेंद्र आव्हाड हा अत्यंत घाणेरडा माणूस आहे. केवळ अजित पवार यांच्यावर टीका करत राहणं एवढंच त्याचं काम आहे. आता ठाण्यामध्ये जी घटना घडली त्याच्यावर ते का बोलत नाही. याचा उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी मला द्यावे. केवळ अजित पवारांवर बोलत राहणं एवढंच त्यांचं काम आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ जितेंद्र आव्हाड यांनी लावला आहे”, असे देखील मुश्रीफ म्हणाले.