ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चेन्नई – सुरत ग्रीनफिल्ड हायवेबद्दल शेतकऱ्यांत संतापाची लाट ; नुकसान भरपाईबद्दल तीव्र नाराजी, शेतकरी संघर्ष समितीची शनिवारी बैठक

अक्कलकोट,दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील चेन्नई – सुरत ग्रीन फिल्ड हायवेमधील बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला हा बाजारभावापेक्षा अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात आता शेतकऱ्यांकडून संघर्ष समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असून येत्या शनिवारी दुपारी दीड वाजता अक्कलकोट येथे शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत निर्णय विरोधात भूमिका घेतली जाणार आहे.

दरम्यान सध्या अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये याबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. देशाचा विकास हा रस्त्याने जरूर होत आहे पण शेतकऱ्यांचे नुकसान करून तो करू नये, अशी भूमिका या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. बहुचर्चित चेन्नई ते सुरत हा ग्रीनफिल्ड हायवे अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी, अक्कलकोट, नागनहळ्ळी, उमरगे, मिरजगी, मैंदर्गी, नागोरे, संगोगी (ब), मुगळी, दुधनी, बोरेगाव, डोंबरजवळगे चपळगाव, चपळगाववाडी, दहिटणेवाडी हसापूर या सोळा गावातून जाणार आहे साधारण ३६ किलोमीटर हायवे हा या तालुक्यातून जाणार आहे. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याची अपेक्षा होती. परंतु दोन दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांना रकमेच्या नोटीसा प्राप्त झाल्या आहेत. यात जिरायत जमिनीला एकरी ४ ते ५ लाख रुपये व बागायत जमिनीला ५ ते ७ लाख रुपये दर जाहीर करण्यात आला आहे.

वास्तविक पाहता या जमिनीचा खाजगी बाजार भाव हा दुप्पटीने चालू आहे असे असताना प्रशासनाकडून शासकीय मूल्यांकनाप्रमाणे नोटीसा कशा बजावण्यात आल्या ? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या निर्णयाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध दिसत आहे. अक्कलकोट ते सोलापूर रस्ता ज्यावेळी झाला. त्यावेळी शेतकऱ्यांना करोडो रुपये नुकसान भरपाई पोटी मिळाले. तुलनेने चेन्नई- सुरत रस्त्यातील शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही अत्यंत कमी आहे. यामुळे शेतकरी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी राजे फत्तेसिंह बोर्डिंग, मंगरुळे प्रशाले जवळ अक्कलकोट येथे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

नुकसान भरपाईचा मोबदला नाकारणार

प्रशासनाकडून जाहीर झालेला मोबदला आम्ही नाकारणार आहोत. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांशी निवेदन देणार आहोत तसेच या निर्णयाचा निषेध म्हणून आणि मनाचा मोठेपणा म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आम्ही या जमिनीत दानपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा उठाव तर शंभर टक्के होणार आहे –  संजय देशमुख, तालुका प्रमुख शिवसेना

 

शेतकऱ्यांना गुंठेनिहाय रक्कम मिळावी

यापूर्वी राज्य व देशात अनेक महामार्ग झाले आहेत. या मार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपये मिळाले आहेत. तसेच यापूर्वीच्या काळात प्रत्येक शेतकऱ्यांना गुंठेनिहाय रक्कम मिळाली आहे. चेन्नई – सुरत ग्रीनफिल्ड मध्ये मात्र एकरी आणि तेही अत्यल्प रक्कम मिळणार असल्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय होणार आहे –  सुरेखा होळीकट्टी, महिला आघाडी भाजप

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!