परभणी : वृत्तसंस्था
समाज माध्यमांतून नियमित सादर होणारे सीझन एक, दोन, तीनसारखे मागील दहा वर्षांत भाजपच्या नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी सुरू केलेले जुमला एक, दोन काही काळासाठी बरे वाटले; परंतु आता सुरू केलेला सीझन हा जुमला तीन असून त्याला नाकारण्याचा संकल्प जनतेने केला आहे, असे सांगत यावेळची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. या हुकूमशाहीला यावेळी तडिपार करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीत केले.
परभणी लोक सभा मतदारसंघाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी शहरातील प्रियदर्शनी क्रीडा संकुलात मंगळवारी सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भरपावसात उद्धव ठाकरे यांनी परभणीकरांशी संवाद साधला. मागील काही दिवसांपासून भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे महिलांचा अपमान करणारे भाषण करत आहेत. हा असंस्कृतपणा शोभणारा नाही. जनतेला मान खाली घालावे लागणारे हे कृत्य आहे.
महाराष्ट्र आणि देश हे कदापि सहन करणार नाही. मोदींचा चेहरा चालत नाही, म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरून मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असे सांगत परभणीकर पैशाने विकले जात नाहीत, हे दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक गीतातून जय भवानी शब्द काढून टाकणार नाही असे स्पष्ट करत, यामुळेच त्यांना उठाबशा काढाव्या लागणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. परभणीतून यावेळी चिन्ह बदलले असले तरी विशाल विजयाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.