ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पोलिसांच्या हक्कांसाठी आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्याना महत्वाची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था 

शिवसेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत पोलिस दलाशी संबंधित काही महत्त्वाच्या मागण्यांवर लक्ष वेधले आहे. पोलिसांसाठी आयुष्य झोकून देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईचे रक्षण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शहरातच हक्काचे घर मिळावे. अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वर्षानुवर्षे मुंबईत सेवा बजावत असतात, परंतु निवृत्तीनंतर त्यांना घरांच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे सेवानिवृत्त पोलिसांसाठी मुंबईत घर उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, असे आमदारांनी नमूद केले.

याशिवाय पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर असलेल्या दंडात्मक शुल्काबाबतही त्यांनी मुद्दा उपस्थित केला. गेल्या काही वर्षांत या शुल्कात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर लागणारे दंडात्मक शुल्क कमी करावे किंवा शक्य असल्यास पूर्णपणे माफ करावे, अशी विनंती त्यांनी केली.

पोलिस भरती प्रक्रियेत उमेदवारांना राहण्यासाठी योग्य निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. भरतीसाठी येणाऱ्या युवक-युवतींना राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था न मिळाल्यास त्यांना उघड्यावर राहावे लागते, अशी समस्या उभी राहते.

आदित्य ठाकरे यांनी हे सर्व मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर करत पोलिस दलाच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने लक्ष देण्याची मागणी केली आहे. या मागण्यांवर सरकारची प्रतिक्रिया काय राहील, हे आता राजकीय व प्रशासकीय वर्तुळाकडे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!