राजे साहेबांची उणीव ऍड.सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टने भरून काढली
पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट येथे अभिवादनाचा कार्यक्रम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
पूर्वी संस्थानकालीन काळात गरिबांना मदत करण्यासाठी राजेसाहेब होते.आता सध्याच्या परिस्थितीमध्ये राजे साहेबांची उणीव एड. सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भरून निघत आहे. त्यांच्या ट्रस्टचे कार्य हे निश्चितच वंचितांचे अश्रू पुसणारे आहे,असे प्रतिपादन अक्कलकोट राजघराण्याचे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी केले.
बुधवारी, अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात एड. जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एड. जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष एड. शरदराव फुटाणे हे होते.
यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉ.वीरेंद्र अवस्थी, डॉ. अनुराधा अवस्थी,विश्वस्त शिवाजीराव पाटील, परितोष जाधव, माधुरी जाधव ,संतोष जाधव – फुटाणे, राम जाधव,सुभाष गडसिंग,तानाजी चव्हाण ताराबाई हंडे, रमेश फडतरे ,अंबणप्पा भंगे, के. बी.पाटील, अमोल पाटील ,माणिक बिराजदार, सुधाकर गोंडाळ आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना मालोजीराजे भोसले म्हणाले, समाजात संवेदनशीलता कमी होत असताना सर्जेराव जाधव यांच्यासारखी माणसे आपल्या कार्याने समाजात माणुसकी जिवंत ठेवले आहेत.ते जरी सध्या नसले तरी त्यांचे अमर आहे.अशा संस्थेच्या कार्याला बळ देणे आमच्यासारख्यांचे देखील काम आहे आणि ते आम्ही निश्चितपणाने देऊ,अशी ग्वाही त्यांनी दिली.अध्यक्षस्थानावरून बोलताना एड. फुटाणे म्हणाले की, सर्जेराव जाधव यांनी हयात असतानाच संस्थेची घटना तयार केली आहे त्या घटनेनुसारच संस्थेचा कारभार सुरू आहे.पुढे देखील त्याच पद्धतीने सामाजिक कार्याचा हा वसा पुढे चालू ठेवू. संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने या संस्थेचा कारभार पुढे नेत आहेत.एडवोकेट सर्जेराव जाधव यांचे गोर गरीब जनतेला प्रवाहात मुख्य आणण्याचे जे स्वप्न होते.ते स्वप्न तंतोतंत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे,असे ते म्हणाले.
यावेळी संचारचे मारुती बावडे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ट्रस्टच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी लायन्सचे राजकुमार कापसे,एड. के.एस. हल्ले, बापूजी निंबाळकर आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.यात शंभर जणांची तपासणी झाली. यासाठी राजू मलंग,नीलकंठ कापसे यांचे सहकार्य लाभले.त्याशिवाय या कार्यक्रमात गोरगरीब वंचितांना वैद्यकीय व इतर कारणासाठी मदतीचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी विश्वस्त सुरेश फडतरे यांनी केले.प्रास्ताविकात फडतरे यांनी सर्जेराव जाधव यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्पे आणि संस्थेचे कामकाज यावर सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन विश्वस्त मोहनराव चव्हाण यांनी केले तर आभार विश्वस्त शंकरराव पवार यांनी मानले.