पुणे : वृत्तसंस्था
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत जिंकलाच पाहिजे. सर्व मतभेद विसरून आणि बाजूला ठेवून जास्तीत जास्त मताधिक्याने उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागा. इंदापूर तालुक्यात सर्वाधिक मताधिक्य मिळायला हवे, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या समर्थकांना केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती लोकसभा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा चंग बांधलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी इंदापूरमधील पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये विधानसभेला आम्हाला मदत करणार असाल तरच सुनेत्रा पवार यांचा प्रचार करू, अशी भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शुक्रवारी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईत बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. फडणवीस यांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले, आम्ही महायुतीचा धर्म पाळू, पण प्रत्येकानेच तो पाळायला हवा. आता आम्ही त्यांचे काम करू, पण त्यांनी भविष्यात आमचे काम केले पाहिजे, अशी आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. आज आम्ही केले आणि उद्या त्यांनी काम केले नाही असे व्हायला नको. आमच्या मतदारसंघाची सर्व जबाबदारी फडणवीस यांनी घेतली आहे.