नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. दिल्लीत बुधवारी झालेल्या या बैठकीत तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू व संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांच्यासह सर्व घटकपक्षांच्या नेत्यांनी एनडीएला समर्थन देत असल्याचे पत्र सादर केले. त्यामुळे निकालानंतर चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चाना पूर्णविराम मिळाला.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आघाडीचे नेते म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीत या प्रस्तावावर सर्व पक्षांनी आपली सहमती नोंदविली. नितीश कुमार यांनी एनडीएने सरकार स्थापनेचा तातडीने दावा करण्याची मागणी केली, तर चंद्राबाबू नायडू यांनीही त्यास उशीर करू नये, असेही मत व्यक्त केले. दरम्यान, या बैठकीनंतर चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत नायडू यांनी लोकसभाध्यक्षपदासह तीन महत्त्वाच्या खात्यांची मागणी केल्याचे समजते.