मारुती बावडे
अक्कलकोट : येथील श्री स्वामी समर्थ कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता तालुक्यात दुधनी व अक्कलकोट बाजार समितीच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात आणि ही रणधुमाळी सुरू होऊ शकते अशा पद्धतीचे चित्र सध्या तालुक्यात आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका पुढे गेल्यानंतर आता तालुक्यातील नेते मंडळींचे लक्ष या निवडणुकांकडे लागला आहे. या निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे प्रयत्न करताना दिसत आहेत.
सचिन कल्याणशेट्टी हे सध्या आमदार असल्याने आता या तिन्ही संस्थांच्या बाबतीत त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. अक्कलकोट बाजार समितीची निवडणूक २०१५ मध्ये बिनविरोध झाली होती. त्यावेळी पाटील, म्हेत्रे आणि कल्याणशेट्टी गटाने मिळून १८ जागा बिनविरोध केल्या होत्या. त्यानंतर बाजार समितीचे सूत्रे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे पुत्र संजीवकुमार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
या महिन्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत नवीन प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. यात जुन्या संचालक मंडळाला एक वर्षाची मुदत वाढ मिळाली होती. दुधनी बाजार समितीची निवडणूक लागणार आहे. यात मागच्या वेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पॅनलने बाजी मारली होती. त्यात हमाल तोलार एक आणि व्यापारी व गटातून दोन अशा तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. १५ जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यात पूर्णपणे म्हेत्रे यांचे वर्चस्व राहिले होते. या ठिकाणी १८ जागा संचालकांच्या आहेत. सभापती पदाची सूत्रे प्रथमेश म्हेत्रे यांच्याकडे आहेत. या ठिकाणी सत्ता मिळवणे भाजपच्या दृष्टीने आव्हानात्मक राहणार आहे.
स्वामी समर्थ कारखाना गेल्या अनेक वर्ष बंद होता यावर्षी तो सुरू होण्याच्या स्थितीत आहे. अशातच संचालक मंडळाची निवडणूक सुरू झाली आहे. या निवडणुकीतही माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार कल्याणशेट्टी गट सक्रिय असल्याचे दिसत आहे. म्हेत्रे गटाने याबाबतीत अद्याप भूमिका घेतली नाही. तालुक्यात सहकार क्षेत्राशी संबंधित या तीन संस्थांच्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत. या तिन्ही संस्थांवर आता पुढील काळात वर्चस्व कोणाचे राहणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. बदलते राजकिय समीकरणे पाहता या निवडणुकीमध्ये संभाव्य गणित काय असू शकतात याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळातून सुरू आहे.