मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या विरोधात लढा देत असतांना १४ फेब्रुवारी रोजी भाजप नेते नारायण राणे यांनी त्यांच्यावर ट्वीट सडकून टीका केली. यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाने राणे पिता-पुत्रांविरोधात आंदोलने सुरू केली आहे. काही ठिकाणी रास्तारोको देखील करण्यात आलाय.
धुळ्यात मराठा समाजाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी राणे पिता-पुत्रांचे फोटो असलेले बॅनर जाळले आहेत. तसेच प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेधही केला आहे. यावेळी काही आंदोलकांनी ‘कोंबडी चोर’ असा उल्लेख करत घोषणाबाजी देखील केली.
धुळे शहरातील स्वस्तिक चौकात राणे पिता पुत्रांच्या निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक एकवटले होते. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बोलताना राणे कुटुंबियांनी तोंड सांभाळावे, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही मराठा आंदोलकांनी दिला आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही मराठा आंदोलकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत नारायण राणे यांच्या टीकेचा निषेध केला. बीडच्या रायमोहा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राणे पिता-पुत्रांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मराठा समाजाने नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं. यावेळी आंदोलकांनी संभाजीनगर-जळगाव महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात देखील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य शासनासह नारायण राणे यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. नारायण राणेंना अटक करा, अशी मागणीच मराठा आंदोलकांनी केली.