मुंबई वृत्तसंस्था
अजित पवारांनी तासगाव कवठेमहाकांळ या ठिकाणी बोलताना आर. आर. पाटलांवर आरोप केले होते. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
अजित पवार म्हणाले होते की, केवळ मला बदनाम करण्यासाठी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले. पण महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि इतर खर्च ४२ हजार कोटी एवढा होता. मग ७० हजार कोटींचा घोटाळा कुठून होणार? पण आकडाच इतका मोठा होता की, त्यातून माझी बदनामी झाली. पुढे चौकशीसाठी एक फाईल तयार केली गेली होती. ती फाईल गृहखात्याकडं गेल्यानंतर आर. आर. पाटीलनं माझी खुली चौकशी करावी, म्हणून स्वाक्षरी केली. केसानं गळा कापयाचे धंदे झाले राव. नंतर आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेतल्यामुळं सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागली.”
तसेच “राष्ट्रपती राजवट लागल्यामुळे तत्कालीन राज्यपालांनी फाईलवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. निवडून आलेलं सरकार यावर निर्णय घेईल, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार निवडून आलं. फडणवीस यांनी फाईलवर स्वाक्षरी केली. त्यांनी मला घरी बोलावलं आणि फाईल दाखवली. ते म्हणाले, तुमच्या आबांनी तुमची चौकशी करण्यासाठी या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. आता मला मुख्यमंत्री म्हणून सही करावी लागेल. मला त्यादिवशी खूप वाईट वाटलं” असं अजित पवार म्हणाले होते.
याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात माझी भूमिका मी मांडली आहे. तसंच जी फाईल दाखवल्याचा उल्लेख झाला ती कुठल्याही प्रकारची गोपनीय फाईल नाही. ज्यांना वाटत असेल त्यांनी ती मागवावी. वारंवार तो प्रश्न नको. आर. आर. पाटील हयातीत नाहीत. त्यामुळे त्या विषयावर बोलणं योग्य नाही.