मुंबई वृत्तसंस्था
नव्या सरकारचा शपथविधी होण्याआधीच आज महायुतीत हालचाली वाढल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या सरकारी निवासस्थानी भाजपचे नेते पोहोचले आहेत. तर अशातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज दुपारी दिल्ली जाणार आहेत. अजित पवार दिल्लीत जाऊन अमित शाह यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. या भेटीत खातेवाटपावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. मागच्या वर्षी जेव्हा अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांना नऊ मंत्रिपदं दिली गेली होती. असं असताना आता अजित पवार गटाला किती मंत्रिपदं मिळणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. पण आता ती रद्द झाली आहे. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या आज सर्व बैठका रद्द झाल्या आहेत. आज एकनाथ शिंदे ठाण्यातील घरी असणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या ‘सागर’ बंगल्यावर भाजपचे महत्त्वाचे नेते पोहोचले आहेत. चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर आणि गिरीश महाजन, माधुरी मिसाळ राजेंद्र राऊत आणि अनिल बोंडे हे नेते देवेंद्र फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजप नेत्याची महत्वाची बैठक होत आहे.