मुंबई वृत्तसंस्था
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना आयकर विभागाकडून दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती रिलीज केली आहे.दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनलने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांची संपत्ति इनकम टॅक्स विभागाने जप्त केली होती.
न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त केलेली संपत्ती मुक्त करण्यात आली आहे. लवकरच जप्त केलेली संपत्ती अजित पवार यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली जाईल. दरम्यान, 7 ऑक्टोबर 2021 मध्ये अजित पवारांच्या विविध मालमत्तेवर आयकर विभागाने छापा टाकून संपत्ती जप्त केली होती.
बेनामी मालमत्ता प्रकरणात न्यायाधिकरणाकडून अजित पवारांना दिलासा मिळाला आहे. 2021 मध्ये झालेल्या बेनामी संपत्ती प्रकरणात जप्त केलेल्या मालमत्तेची सुटका करण्यात आली आहे. दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपीलीय न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर आयकर विभागाने ही कारवाई केली. न्यायाधिकरणाने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध बेनामी मालमत्तेच्या मालकीचे आरोप फेटाळून लावले.
अजित पवार यांच्या ३० पैकी जास्त मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. यात ४०० कोटींपेक्षा जास्त किंमतीचा जरंडेश्वर साखर कारखाना, दिल्लीतील २० कोटींचा फ्लॅट, पार्थ पवार यांचं २५ कोटींचं निर्मल ऑफिस, गोल्यातील २५० कोटी रुपयांचं निलय रिसॉर्ट याशिवाय पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील २७ वेगवेगळ्या ठिकाणची जमीन यांचा समावेश होता.