ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘अजित पवार’ उमेदवार; नाव आणि घड्याळामुळे राजकीय चर्चांना उधाण

पिंपरी-चिंचवड वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात एक अनोखी आणि गोंधळ उडवणारी घटना समोर आली आहे. ‘अजित पवार’ या नावाचा उमेदवार थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, हेच नाव राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी जुळत असल्याने पहिल्यांदा ही माहिती समोर येताच नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

खरं तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ मधून अजित पोपट पवार या स्थानिक उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी ‘ड’ जागेसाठी अर्ज भरला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर अर्ज दाखल केल्यामुळे चर्चांना आणखी जोर आला आहे. ‘अजित पवार’ हे नाव आणि घड्याळ चिन्ह एकत्र आल्याने मतदार, कार्यकर्ते आणि विरोधकांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे.

या घडामोडींची चर्चा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात रंगली असून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, या अजित पोपट पवार यांना अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत एबी फॉर्म मिळालेला नाही. त्यामुळे ते पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत की नाही, याबाबत सध्या स्पष्टता नाही.

जर एबी फॉर्म मिळाला, तर अजित पोपट पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ठरू शकतात आणि या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच राजकीय वळण मिळू शकते. त्यामुळे येत्या काही तासांत काय निर्णय होतो, याकडे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!