सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण तापले असून शरद पवार गटाचे नेते राज्याच्या दौऱ्यावर पडले असून सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना शरद पवार गटाच्या नेत्यांनी सताधारी नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.
अजित पवार हे महाविकास आघाडीबरोबर राहिले असते, तर ते मुख्यमंत्री झाले असते, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. अजित पवार हे महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री पदावर आहेत. जयंत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत
माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आले असता पाटील बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खा. डॉ. अमोल कोल्हे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, युवाचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, पंडित कांबळे, राजा राजापूरकर, नागेश फाटे, सुरेश गव्हाणे, मदनसिंह मोहिते-पाटील, जयमाला गायकवाड, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, उत्तमराव जानकर, संकल्प डोळस उपस्थित होते.
पाटील म्हणाले, अजित पवार हे मुख्यमंत्री पदासाठी भाजपसोबत गेल्याची चर्चा होती. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्दही भाजपकडून दिल्याचे बोलले जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत अनेकदा दावाही केला होता. मात्र, अजुनतरी त्यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण झालेली नाही.
पाटील म्हणाले, दोघांचा टेकू घेऊन तयार झालेले केंद्रातील मोदी सरकार हे अस्थिर आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला निवडून द्या. केंद्रात ही आपले सरकार तयार होईल. अर्थसंकल्पात नुसताच घोषणांचा व योजनांचा पाऊस पाडला आहे. केवळ जाहिरातीवर 270 कोटीचा खर्च केला आहे. आता प्रत्येक घरात सरकारच्या योजना सांगणार्या संदेश दूतास 10 हजार रुपये मानधन देण्यासाठी 300 कोटी राखीव ठेवले आहेत. खा. धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत लागणार्या सगळ्याच वस्तूवरती जीएसटी लावला आहे. मेडिक्लेमवरही जीएसटी आहे. हे सरकार फसव्या व मोठ्या योजनेची आकडेवारी सांगते. पंतप्रधान सिंचन योजनेतून निरा देवधर योजनेच्या प्रश्नासाठी निधी देण्याची मागणी मी केली. समाजातील एकोपा बिघडू देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले.
सरकारच्या विरोधात बोलणार्याला ईडी, सीबीआयचा धाक दाखवला जातो. कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क कमी करा, म्हणून आम्ही आंदोलन केले. पण, विरोधक याचा उलटा प्रचार करतात. केंद्रातील पंतप्रधान व गृहमंत्री महाराष्ट्रात येतात व शरद पवारांवर टीका करतात. परंतु, विकासावर काही बोलत नाहीत. महाराष्ट्रात आपले सरकार बसवा, दिल्लीतही आपले सरकार बसायला वेळ लागणार नाही, असे मत खा. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.