पुणे वृत्तसंस्था : निवडणुकीच्या तोंडावर एकत्र आलेल्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जबरदस्त पराभवाचा सामना करावा लागत आहे. जोरदार प्रचार, मोठ्या सभा आणि राजकीय ताकद पणाला लावूनही दोन्ही राष्ट्रवादींची युती मतदारांना फारशी भावली नाही, असा स्पष्ट संदेश निकालातून मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ७४ जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठला असून सत्ता कायम राखण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे. याउलट, एकत्रित राष्ट्रवादी आघाडीला सध्या केवळ ४१ जागांवर समाधान मानावे लागत आहे.
पुणे महानगरपालिकेतही भाजपचीच सरशी दिसून येत आहे. १६५ जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत भाजपने तब्बल ९० जागांवर आघाडी घेत एकहाती सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. पुणे महापालिकेत बहुमतासाठी ८२ जागांची आवश्यकता असताना भाजपने तो टप्पा सहज पार केला आहे.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध करत काँग्रेसमध्ये गेलेले प्रशांत जगताप यांनी पुण्यात लक्षवेधी विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत त्यांनी भाजपचे उमेदवार अभिजीत शिवरकर यांचा सुमारे १८०० मतांनी पराभव केला. या विजयामुळे पुण्यात काँग्रेसने खाते उघडले असून आतापर्यंत काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाल्याची माहिती आहे.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. मात्र, त्यांच्याविरोधात उभे असलेल्या प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणत राजकीय समीकरणे बदलून टाकली.
एकूणच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता अबाधित ठेवली असून, अजित पवार–शरद पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादीला हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.