अक्कलकोट वृत्तसंस्था
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २७ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे. यंदाचे २८ वे वर्ष असून गुरुवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. श्रोक्षेत्र अक्कलकोट येथून प्रस्थान होणार असून, ६ महिने पालखी पादुका महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यासह दिनांक २६ जून २०२५ रोजी तीर्थक्षेत्र नगरीत विसावणार असल्याचे माहिती न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले, सचिव शामराव मोरे आणि पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले यांनी दिली आहे. सदरची पालखी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, बृहन मुंबई, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या विभागातून जाणार आहे.
या परिक्रमेचा शुभारंभ श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुरोहित प.पु. मोहनराव पुजारी, मंदार मोहनराव पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे प.पू अण्णू महाराज पुजारी,धनंजय पुजारी आणि श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते श्रींच्या पदुकाचे पूजन करून करण्यात येणार आहे.
न्यासाच्या वतीने अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रासह अन्य राज्यातील गावोगावी असलेल्या स्वामी भक्तांना दर्शन करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी परीक्रमेचे आयोजन केले आहे. तसेच अन्य कारणास्तव दूरवरच्या आबाल वृद्ध, महिला स्वामी भक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळ स्थानी अक्कलकोट येथे येता येत नांही आशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी येत आहेत.
श्री समर्थ स्वामींच्या साधू-संतत्वाची ख्याती आणि त्यांच्या भक्तीचा सुगंध गेली सव्वाशे वर्षापासून उभ्या भारतभर पसरत आहे. स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या महात्म्याची प्रचीती येऊन तद्वत त्यांच्या भक्तींची लौकिक आणि अलौकिक अनुभूती येऊन त्यांचे जिवन संपन्न बनत आहे. श्री स्वामी समर्थांची पालखी पादुका आपल्या गावी येत आहे.
श्री स्वामींच्या मूळस्थान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या इच्छानेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), स्थापन झाले असून येथे दैनंदिन दोन्ही वेळेस हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. अन्नछत्रतर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, आपदग्रस्तांना मदत व शहरातील दिव्यांग, निराधार लोकांना समर्थ महाप्रसाद सेवा, तालुक्यातील ८६ कुस्तीगारांना खुराक वाटप, आरोग्य विषयक इतर विविध कार्याक्रम राबविले जातात, तसेच शासनाच्या विविध उपक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य करीत असते.
मंडळाच्या मालकीच्या जागेत यात्री निवास, यात्री भुवन, अतिथी निवास या निवासी इमारती कार्यारत असून महाप्रसाद गृह, ध्यान धारणा मंदिर, मंगल कार्यालय आदी मोठा प्रकल्प उभा राहणार आहे. न्यासाच्या परिसरात सध्या स्वामी भक्तांच्या सेवेत तात्पुरत्या महाप्रसाद गृह बरोबरच श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर, नूतन महाप्रसाद गृह बांधकाम चालू असून, कपिला गाय, उभी स्वामी मूर्ती, कारंजा, शिवस्मारक, इनडोर-औटडोर जिम, प्रशस्त वाहन तळ, श्री स्वामी समर्थ वाटिका व बालोध्यान, शिवचरित्र प्रदर्शन हॉल, अग्निशामक, रुग्णवाहिका, राज्य परिवाहन महामंडळाच्या चालक व वाहकांना करिता अध्यावत राहण्याची सोय, सौर उर्जा प्रकल्प याबरोबरच विविध दिन उत्सव, पोर्णिमा, चतुर्थी, एकादशी आदी कार्यक्रम न्यास साजरा करते.
६ महिने पालखी
गेल्या २७ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. याकाळात सुमारे २१७ दिवसामध्ये १० हजार कि.मी.चा प्रवास सुमारे ५०० गावे महाराष्ट्रातील ३५ जिल्हे व ७५ तालुक्यातून कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मुक्काम तर गोवा राज्यातील २ जिल्ह्यात मुक्काम पालखीचा असतो. याबरोबरच बृहन मुंबई, ठाणे, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पुणे या महानगरा बरोबरच सांगली, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, बुलाढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, नांदेड, अ.नगर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यातून परिक्रमा होत असून विशेष म्हणजे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ राज्यासह गडचिरोली शहर व परदेशातून देखील मागणी होत आहे. पालखी परिक्रमेच्या अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक संतोष भोसले-९८२२८१०९६६, ८५५८८५५६७५ यांना संपर्क करण्याचे आवाहन न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी केले आहे.