फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राजीव माने यांचा पारदर्शक कारभार
कन्या प्रशालेच्या शालेय समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
अक्कलकोट वृत्तसंस्था
फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष राजीव माने यांनी पारदर्शक कारभार केला असून त्यांच्या या कार्यामुळे त्यांची निवड श्रीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशालेच्या शालेय समिती सदस्यपदी झाली आहे, असे मत सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे जेष्ठ विश्वस्त शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले. शनिवारी,फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने यांची मराठा मंदिर मुंबई संचलित राणी निर्मला राजे कन्या प्रशालेच्या शालेय समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एडवोकेट शरदराव जाधव – फुटाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पाटील म्हणाले, स्वर्गीय आमदार बी.टी माने यांचा वारसा राजीव माने यांना आहे.आमदारकीच्या काळात देखील माने यांनी त्यावेळी तालुक्यासाठी मोठे योगदान दिले होते. त्या काळात ते अनेक शिक्षण संस्था उघडू शकले असते परंतु आहे त्या संस्था नीट टिकवण्याचे काम त्यांनी केले. आता त्यांचे पुत्र राजीव हे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात प्रामाणिकपणे योगदान देत आहेत. मराठा मंदिर मुंबईसारख्या नामांकित संस्थेवर त्यांची निवड झाल्याने आम्हाला त्यांचा निश्चितच अभिमान आणि गर्व आहे.
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त सुरेश फडतरे यांनी राजे फत्तेसिंह बोर्डिंग, शहाजी प्रशाला आणि सर्जेराव जाधव ट्रस्टचा इतिहास सांगून त्यांची वाटचाल त्या काळात कशा पद्धतीने झाली. यात कोणा कोणाचे योगदान लाभले याचा उल्लेख करत त्याचा रंजक इतिहास उपस्थितांना सांगितला. सत्काराला उत्तर देताना राजीव माने यांनी एडवोकेट शरदराव फुटाणे यांचे विशेष आभार मानले. वेळोवेळी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे संस्थेचा कारभार सुरळीतपणे सुरू आहे.कन्या प्रशालेत देखील अशाच पद्धतीने आपण चांगले कार्य करून शाळेचा विकास करू, असे अभिवचन त्यांनी दिले.
यावेळी फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जाधव फुटाणे, विश्वस्त मोहनराव चव्हाण, कर्मचारी सुखदेव चव्हाण आदी उपस्थित होते.