अक्कलकोट, वृत्तसंस्था
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न खरोखर अधिकच आहेत. पत्रकारितेमध्ये आर्थिक प्रश्न सुटत नाही. तरीपण जिद्द आणि आवड या तत्वावर आधारित पत्रकार पत्रकारिता करीत असतात. त्यांचे प्रश्न शासन दरबारी कोणतेही असतील तर ते सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. सोमवारी, अक्कलकोट येथील भाजप कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त सर्व तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, अक्कलकोट तालुक्याच्या विकासामध्ये तालुक्यातील सर्वच पत्रकारांचे योगदान मोठे आहे. पत्रकारांमुळे अनेक समाज घटकांना न्याय मिळतो हे कार्य अखंडपणे चालू राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम बाळशंकर यांनी केले. यावेळी जेष्ठ पत्रकार बाबासाहेब निंबाळकर यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्न बाबत चर्चा केली. दैनिक संचारचे पत्रकार मारुती बावडे यांनीही मनोगत व्यक्त करताना तालुक्यातील विकास कामे आणि सकारात्मक पत्रकारिता याबद्दल भाष्य केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडिखाबे यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार प्रशांत भगरे, प्रवीण देशमुख ,नंदकुमार जगदाळे, स्वामीराव गायकवाड, योगेश कबाडे, अरविंद पाटील, रविकांत धनशेट्टी, चेतन जाधव, सोमशेखर जमशेट्टी, महेश गायकवाड, दयानंद दणुरे, रमेश भंडारी, सैदप्पा इंगळे, यशवंत पाटील,सैदप्पा इंगळे, शिवा याळवार, शिवानंद गोगाव, रियाज सैय्यद, आदित्य अंबुरे, महादेव जंबगी यांच्यासह तालुक्यातील आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान व सत्कार आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, बसवराज तानवडे, सिद्धाराम बाके, दयानंद बमनळळी आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नागेश कलशेट्टी चंद्रकांत दसले, धनंजय गाढवे आदींनी परिश्रम घेतले. आभार शिवानंद फुलारी यांनी मानले.