गुरूशांत माशाळ
दुधनी दि. ०१ : अक्कलकोट आणि गाणगापूर या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या राष्ट्रीय (महामार्ग क्रमांक १५०) या महामार्गाला हॉटेल शांभवी कॉर्नर ते येगदी मळ्यापर्यन्त तर सांगोळगी गावाजवळील ब्रिजपासून बिंजगेर गावाजवळील चढणपर्यन्त रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या महामार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. खड्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाली आहे. या रस्त्यावर जाणारे वाहने अगदी डोलायमान होवून जात आहेत. वाहन चालकाना खड्ड्यांचा अंदाज समजत नसल्याने वाहने जमिनीला आदळून वाहनांची हानी होत आहे. यामुळे वाहनांचा मोठी दुर्दशा होत आहे तर चालकांना कंबर दुखी जाणवत आहे. त्याचबरोबर दुधनी रेल्वे गेटजवळ उड्डाण पूल होणे गरजेचे बनले आहे. येथे उड्डाण पूल मंजूर आहे मात्र उड्डाण पुलाचे काम रखडल्याने रेल्वे गेटवर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागत आहे.
ज्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत त्या जागेवरून वाहन पुढे जाताना दुचाकी वाहन धारकांना मोठी वाहने अंगावर तर पडणार नाही ना? अशी भीती मनात बाळगून कसरत करत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अक्कलकोटहून गाणगापूर येथील दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्ताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे ज्याज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी रोज वादा-वादी भांडणे होत आहेत. त्याचबरोबर रोज छोटे- मोठे अपघात होत आहेत.
राज्यातील शेकडो भाविक रोज तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी येतात आणि नंतर आवर्जून गाणगापूर येथील श्री दत्त महाराज यांच्या दर्शनासाठी जाण्यासाठी प्राधान्य देतात. गाणगापूरला जाऊ इच्छित स्वामी भक्तांना अक्कलकोट – दुधनी-गाणगापूर याशिवाय दुसरा मार्ग नाही. सोलापूरहून कलबुर्गीकडे, कलबुर्गीहून सोलापूरकडे रोज जाणारे जड वाहने दुधनीवारूनच जातात जड वाहनामुळे रास्ते ठीक-ठिकाणी खचले गेले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते.
यावर्षी दुधनी शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यावरील मुरूम कडेला जावून रस्ते निसरडे बनले आहेत. यामुळे संबधित विभागाने या मार्गावरील सर्व खड्डे त्वरित बुजवून स्वामी भक्ताना दिलासा द्यावी अशी मागणी होत आहे.