भूसंपादनातील दिरंगाईमुळे अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्याचे काम अर्धवट ; १६८ कोटींचा निधी मिळूनही चार वर्षापासून काम अपूर्ण
अक्कलकोट, दि.२७ : प्रशासनाच्या भूसंपादनातील दिरंगाईमुळे अक्कलकोट ते नळदुर्ग चाळीस किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे.दोन तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या तब्बल १६८ कोटी रुपयेच्या रस्त्याचे काम आता नेमके पूर्ण होणार तरी कधी ? असा सवाल भाविकांतून उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे मिळाल्यास रस्त्याची अडचण दूर होणार आहे परिणामी दोन तीर्थक्षेत्रांमधील भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. याकडे सोलापूर आणि उस्मानाबादचे जिल्हा प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने हा प्रश्न चिघळला आहे, असे शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ज्यावेळी पहिली याचिका दाखल केली त्यावेळी भूसंपादन करून मोबदला देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते त्याचवेळी काम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते तरीही ठेकेदाराकडून हे
काम बऱ्यापैकी पूर्ण केले गेले आहे. सध्या मात्र गेल्या सहा महिन्यापासून याचे काम पूर्णपणे बंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकोट तालुक्यात २३ किलोमीटर पैकी १७ ते १८ किलोमीटर तर तुळजापूर तालुक्यात १७ किलोमीटर पैकी अंदाजे १० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम बाकी आहे. आता पुन्हा शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. यावरचा निर्णय होणे बाकी आहे.
दरम्यान न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला आता आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वास्तविक पाहता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून २०१८ मध्ये १६८ कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५२ म्हणून मंजूर झाले आहेत. हे काम १८ महिन्यात काम पूर्ण करणे अपेक्षित होते परंतु आज घडीला चार वर्ष झाले हे काम पूर्ण झालेले नाही. २८ मार्च २०१९
मध्ये या कामाला अंतरिम स्थगिती मिळाली होती तरीही बळाचा वापर करून काम केले गेले, असा आरोप शेतकरी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी केला आहे.
आता भूसंपादनाचा अहवाल तयार झाला आहे यात सव्वा दोनशे एकर जमीन संपादित होत आहे.जवळपास १८० शेतकऱ्यांची जमीन बाधित होत आहे. हा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून त्याची नुकसान भरपाई मिळावी.एवढीच अपेक्षा शेतकऱ्यांची आहे पण हे करायला प्रशासन दिरंगाई करत आहे.त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. आमचा विरोध रस्त्याला नाही पण मोबदला मिळाला पाहिजे,ही भूमिका आमची आहे, असे अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिवगुंडे यांनी सांगितले.
भाविकांतून तीव्र संताप
तुळजापूर आणि अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांमधील अंतर ८० किलोमीटरचे आहे. हा रस्ता मराठवाडा आणि अक्कलकोटसाठी दुवा ठरणार आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खास बाब म्हणून या रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता परंतु चार वर्षापासून याचे काम अर्धवट राहिल्याने भाविकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशात रस्त्याबाबत प्रचंड मोठी कामे केली आहेत.याबद्दल आमचेही दुमत नसताना नळदुर्ग रस्त्याचे काम मात्र केवळ भूसंपादनाचे पैसे न दिल्यामुळे अर्धवट आहे.त्यामुळे प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी – बाळासाहेब लोंढे- पाटील,सचिव, शेतकरी संघर्ष समिती