ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटला आमदार कल्याणशेट्टी यांच्या रूपाने मंत्रीपदाची लॉटरी ?

मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या

अक्कलकोट, वृत्तसंस्था 

 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश प्राप्त झाल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता लागली आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्याचे जिल्ह्याचे राजकीय समीकरण पाहता कल्याणशेट्टी यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते.

अक्कलकोट विधानसभेचा इतिहास  पाहता सलग दुसऱ्यांदा आमदार पद मिळवत कल्याणशेट्टी यांनी विक्रमी मतांनी निवडून येऊन इतिहास घडवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे नाव म्हणून कल्याणशेट्टी यांचे नाव पुढे येत आहे. केंद्रात आणि राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. अक्कलकोटलाही भाजपचाच आमदार निवडून आला आहे. त्यामुळे आता मतदारसंघाच्या विकासाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. या माध्यमातून

मोठे प्रकल्प हे तालुक्यामध्ये येऊ शकतात. तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न या माध्यमातून मार्गी लागू शकतो. त्याशिवाय अक्कलकोटमध्ये मागच्या अडीच वर्षांमध्ये

जी मंजूर झालेली विकास कामे आहेत त्याला गती मिळू शकते ही कामे पुढील पाच वर्षात पूर्ण होऊ शकतात. यामध्ये देगाव एक्सप्रेस योजना, दक्षिण मधील उर्वरित चौदा गावांना एकरूख योजनेद्वारे पाणी देता येईल. मंजूर झालेली नवीन न्यायालयाची इमारत, दुय्यम निबंधक कार्यालय, नवीन पोलीस स्टेशनची इमारत यासारख्या अनेक गोष्टी पूर्णत्वास जातील.

अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी या तिन्ही शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो. कारण या योजनांना निवडणुकीच्या आधीच निधी मंजूर झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरासाठी जो ३६५ कोटीचा विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने करून अक्कलकोट तीर्थक्षेत्र एक राज्यातील मॉडेल तीर्थक्षेत्र म्हणून उदयाला येऊ शकते. राज्यात आता पुढे पाच वर्ष सत्ता जी राहणार आहे त्याचा फायदा नक्की अक्कलकोटला करून घेता येईल.

कल्याणशेट्टी यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केला तर २०१९ च्या निवडणुकीमध्ये आमदार कल्याणशेट्टी यांनी ३७ हजार मताने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव केला होता. यानंतर अडीच वर्षाच्या महायुतीच्या सरकारच्या काळात मिनी पालकमंत्री म्हणून कल्याणशेट्टी यांच्याकडे अधिकार होते. या काळात बऱ्यापैकी त्यांनी जिल्हा हाताळला आहे. जिल्ह्यातील सर्व आमदारांपैकी एक सॉफ्ट आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे फडणवीस यांनी जिल्हाध्यक्षपदावरून श्रीकांत देशमुख यांची गच्छंती झाल्यानंतर पक्षाला एक नवीन युवा चांगला चेहरा म्हणून कल्याणशेट्टी यांना जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली.

आता विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. यामध्ये ते स्वतः देखील तब्बल ४९ हजार ५०० च्या फरकाने विजयी झाले असल्याने  मंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. सध्या घडीचा राजकीय डावपेच आणि गणिताचा विचार करता सर्व जिल्ह्याला सोबत घेऊन जाणारा एक उत्तम चेहरा म्हणून कल्याणशेट्टी यांचे  नाव सर्वत्र पुढे येऊ लागले आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचारावेळी पक्षाचे राष्ट्रीय  अध्यक्ष जे.पी नड्डा हे येऊन गेले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबतही त्यांचे चांगले जवळचे संबंध आहेत. असे झाल्यास अक्कलकोटला चौथ्यांदा मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहता  १९५२ मध्ये ज्यावेळी दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटची संयुक्तरीत्या पहिली निवडणूक झाली होती. त्यानंतरच्या काळात १९६७ च्या काळामध्ये राणी निर्मलाराजे भोसले या समाज कल्याण राज्यमंत्री झाल्या होत्या तर १९८० मध्ये पार्वतीबाई मलगोंडा या शिक्षण राज्यमंत्री झाल्या होत्या. यानंतर पुढे सिद्धाराम म्हेत्रे  यांनी काँग्रेस आय पक्षातर्फे निवडून येत गृह, तुरुंग फलोत्पादन राज्यमंत्री व ग्रामविकास राज्यमंत्रीचा कार्यभार काही काळ सांभाळला होता. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदी त्यांनी सांभाळले होते.

त्यानंतर आता आमदार कल्याणशेट्टी यांच्या  रूपाने अक्कलकोट तालुक्याला लाल दिवा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार कल्याणशेट्टी यांचे असलेले संबंध पाहता मंत्री पदाच्या दावेदारीमध्ये  त्यांचे नाव सरस ठरू शकते,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या सरकारचा शपथविधी येत्या दोन दिवसात वानखेडे स्टेडियम होणार आहे. त्यामुळे उद्या किंवा परवा दोन दिवसात याबाबतचे चित्र समोर येऊ शकते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळामधून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!