ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्याला नव्या तहसीलदारांची प्रतीक्षा

बाळासाहेब सिरसट यांची पुण्याला बदली

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांची पुण्याला बदली झाल्याने आता अक्कलकोटवासियांना नव्या तहसीलदारांची प्रतीक्षा आहे.तात्पुरता पदभार नायब तहसीलदार विकास पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.बुधवारी,सायंकाळी अक्कलकोट तहसील कार्यालयात त्यांचा निरोप समारंभ पार पडला.

सिरसट यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तालुक्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. तहसीलमधील कारभारात गतिमानता आणली.नागरिकांची कामे वेळेत करण्याबरोबरच अनेकांवर शिस्तीचा बडगा उगारला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अनेक रस्त्याच्या वहिवाटीतील अडचणी दूर केल्या.नवीन रस्ता देणे असेल किंवा सेतू कार्यालयातील सुटसुटीतपणा यासह अन्य कामांवर लक्ष केंद्रित करून सर्वसमावेशक धोरण त्यांनी अवलंबिले होते. वाळू वाहतुकीच्या बाबतीतही त्यांनी कडक धोरण अवलंबिल्याने वाळू तस्करीला मोठ्या प्रमाणात ब्रेक लागला होता.अतिशय शांत, संयमी, मितभाषी अधिकारी म्हणून ते तालुक्याला परिचित झाले होते.लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्यापूर्वी जिल्ह्यातील काही तहसीलदारांच्या बदल्या झालेल्या आहेत.त्यात सिरसट यांची पण बदली झाल्याने काही अंशी नाराजीचा सूरही तालुक्यात दिसून येत आहे.सिरसट हे आता पुण्याला रुजू झाल्याने त्यांचा तात्पुरता पदभार विकास पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.आता नव्या तहसीलदारांची उत्सुकता शिगेला पोहचली असून अनेकांची नावे अक्कलकोटसाठी चर्चेत आहेत परंतु अद्याप अधिकृत नाव समोर आलेले नाही.अनेकांनी वेगवेगळ्या स्तरावर फिल्डिंग लावली असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये नव्या तहसीलदारांची नेमणूक होणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.अनेक जण अक्कलकोटला येण्यासाठी उत्सुक आहेत त्यासाठी काही जणांची धडपडही सुरू आहे. अक्कलकोट तहसीलचे कार्यक्षेत्र मोठे आहे जास्त काळ जागा रिक्त राहिल्यास नागरिकांच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो.त्यामुळे नव्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी,अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले
अक्कलकोट तालुक्यातील जनतेची मागच्या अडीच वर्षात जेवढी कामे मार्गी लावता येतील तेवढी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.ज्या ठिकाणी कायद्याचा बडगा उगारता आला त्या ठिकाणी कारवाई देखील केलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत करून त्यांना न्याय देऊन प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य मिळाले.
– बाळासाहेब सिरसट,तहसीलदार

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!