अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट ते जेऊर मार्गे बरूर या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दोन राज्यांना जोडणाऱ्या ४५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यास २७० कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. गेल्या ३० वर्षापासून तडवळ भागाच्या दृष्टीने आणि मराठवाड्यातील नांदेड-लातूर-उमरगा मार्गाने कर्नाटकातील कलबुर्गी बिदर, आळंद भागासह विजयपूरला जाण्यासाठी सर्वात सोयीचा आणि कमी अंतराचा महामार्ग म्हणून सदर रस्त्याचे काम मार्गी लागणे अतिशय गरजेचे होते. या अनुषंगाने मी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत होतो. तसेच गेल्या महिन्यात अक्कलकोट नूतन बस स्थानकाचे भूमिपूजन प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी आग्रही मागणी केली होती. त्यामुळे देगांव एक्सप्रेस कॅनॉलच्या ४०० कोटींच्या कामानंतर आता पुन्हा तब्बल २७० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळालेली आहे.
हायब्रिड अॅन्युइटी कार्यक्रम टप्पा २ अंतर्गत पॅकेज अन्वये अक्कलकोट जेऊर करजगी-मंगरूळ- तडवळ-कोर्सेगाव बरूर ते एनएच ५२ टाकळी रोड राज्य महामार्ग २११ चा ४५ किलोमीटरचा रस्ता जो अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर यांना जोडतो त्याचा विकास करणेप्रस्तावित आहे त्यातून हा राज्य महामार्ग होत आहे. तडवळ साखर कारखान्याजवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाहतुकीचा अडथळा होऊ नये म्हणून तिथे रस्ता १० मिटरचा करण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून लोकसभेच्या आचारसंहिते नंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आ. कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.