मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी जीपमधून नेत असताना अक्षयने पोलिसाकडील रिव्हॉल्व्हर हिसकावले असता पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात अक्षयचा मृत्यू झाला. या गोळीबारामध्ये एक पोलिस अधिकारीही गंभीर जखमी झाला. दरम्यान, हा प्रकार म्हणजे आत्महत्या की एन्काऊंटर, असा मुद्दा चर्चिला जात आहे. तसेच, या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत.
या घटनेवर ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी X वर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ”अक्षय शिंदे हा महात्मा महापुरुष किंवा सोज्वळ माणूस नव्हता. त्यामुळे त्याच्या मृत्यूवर हळहळण्यात काहीच अर्थ नाही. मात्र त्याच्या एन्काऊंटरच्या निमित्ताने कायद्याची संपूर्ण प्रक्रियाच बायपास करण्याचा जो प्रयत्न झाला; त्यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात त्याची उत्तरे कोण देणार?.” असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
अक्षय शिंदेचा अशा प्रकारे एन्काऊंटर हे एका अर्थाने बदलापूर घटनेच्या प्रकरणातले सत्य बाहेर येण्याआधीच त्याला दडपवून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.