सोलापूर -माध्यमांच्या दुनियेत होत असलेल्या बदलांमुळे रेडओ ही माध्यम मागे पडत असतानाही सोलापूरच्या आकाशवाणी केन्द्रात कल्पकतापूर्ण कार्यक्रम करून सुनील शिनखेडे यांनी त्याची लोकप्रियता इतकी वाढवली की सोलापूरची आकाशवाणी ही लोकवाणी होऊन गेली असे प्रशंसोद्गार प्रीसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी काढले.
आकाशवाणी सोलापूर केन्द्राचे निवृत्ता सहायक संचालक सुनील शिनखेडे यांचा सत्कार आणि त्यांच्यावर काढण्यात आलेल्या ‘रसडोळस` या गौरव पुस्तिकेचे प्रकाशन अशा कार्यक्रमात डॉ. सुहासिनी शहा या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. आकाशवाणी वरील सोलापूर दिनांक या बातमीपत्राच्या पत्रकारांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आकाशवाणी सोलापूरचे केन्द्र प्रमुख राजेन्द्र दासरी यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले होते.
या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. माधवी रायते आणि डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनीही या प्रसंगी भाषण करून सुनील शिनखेडे यांच्या कामाची तसेच प्रशासन कौशल्याची प्रशंसा केली. सुनील शिनखेडे यांनीही विचार व्यक्त केले. सोलापूर आकाशवाणीतल्या सहकाऱ्यांचे सहकार्य आणि समर्पणशीलता यामुळेच आपण हे केन्द्र महाराष्ट्रात एक नावाजलेले केन्द्र म्हणून नावारूपाला आणू शकलो, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेन्द्र दासरी यांनी, यापुढेही आपण या केन्द्राचा महिमा कायम रहावा यासाठी प्रयत्न करू कशी ग्वाही दिली. ॲड. जे. जे. कुलकर्णी यांनीही आपली भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अरविंद जोशी यांनी केले. तर सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी यांनी केले. प्रसारण अधिकारी सुजीत बनसोडे यावेळी उपस्थित होते. सोलापूर दिनांक चे पत्रकार मारुती बावडे, पुरुषोत्तम कुलकर्णी आणि प्रशांत जोशी यांचीही उपस्थिती यावेळी होती.