अक्कलकोट, दि.१९ : मागील हंगामात मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्यास ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची सर्व बिले अदा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या संयमाबद्दल आभार व्यक्त करून यावर्षी देखील कारखान्याला विश्वासाने शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस घालत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
मागील वर्ष म्हेत्रे कुटूंबासाठी खडतर ठरले. या काळात परिवारावर एकापाठोपाठ एक मोठ्ठे धक्के बसले. मला कोरोना झाल्याने चार महिन्यांचा कालावधी डाॅक्टरांच्या देखरेखीखाली गेला.अशात मातोश्री शुगर्सकडे लक्ष देण्यास वेळ कमी पडला. प्रसंगी बिले थकली.परंतु आमच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांकडून मोलाचे सहकार्य लाभल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले. सद्यस्थितीत ऊस पुरवठादार, वाहतुकदार,तोडणी, कर्मचाऱ्यांचे वेतन या सर्व बाबींची पुर्तता झाली आहे.
मागील वर्षाच्या एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे.मागील आठ वर्षात कधीच इतकी अडचण झाली नव्हती. परंतु मागील वर्षी मात्र थोडी अडचण झाली, या काळात सर्वांकडून सहकार्य मिळाले. गेल्या आठ वर्षांपासून मातोश्री शुगर्सकडून नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.केवळ शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव या कारखान्याची निर्मीती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ऊस पुरवठादार शेतकरी, वाहतूकदार,कर्मचारी वर्ग यांनी फार मोठे सहकार्य केले आहे. याची जाणीव आम्हाला आहे. यंदाच्या गाळप हंगामासाठी शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करावा. प्रत्येक पंधरवड्यात बिले अदा करण्यात येतील, असे नियोजन केले आहे, असे तज्ञ संचालक शिवराज म्हेत्रे यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे,कारखान्याचे तज्ञ संचालक शिवराज म्हेत्रे,दुधनी मार्केट कमिटीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, डाॅ.उदय म्हेत्रे, शेती विभाग मुख्य मार्गदर्शक गुरुनाथ लोहार, वर्क मॅनेजर रावसाहेब गदादे, केन मॅनेजर खंडेराया व्हसुरे, प्रोडक्शन मॅनेजर प्रदीप पवार आदी उपस्थित होते.