मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन
मुंबई, दि. १९ : मुंबईतील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा संकल्प आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून त्याला बळ दिले जात आहे. आधुनिक आणि विकसित मुंबई बनवण्यास शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे, आगामी काळात मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जाच्या हस्तांतरणाचा प्रारंभ करण्यात आला. त्याचबरोबर मेट्रो मार्गिका 2-अ आणि 7 चे लोकार्पण, बृहन्मुंबई महापालिकेच्या 20 नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण, 360 खाटांचे भांडूप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील 306 खाटांचे सिद्धार्थनगर रुग्णालय आणि 152 खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम या मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते झाली. सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महानगरपालिकेच्या गोरेगाव, भांडूप आणि ओशिवरा या तीन रूग्णालयांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन, सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, मुंबईसाठी अतिशय गरजेची असलेली मेट्रो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, आरोग्य सेवा, रस्त्यांचे जाळे यासह प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ देण्यास शुभारंभ केला आहे.
देशाची नवी ओळख जगामध्ये आता अधिक ठळक होत आहे, असे सांगून ते म्हणाले की, विकसित भारताची उत्सुकता आता केवळ देशातच नव्हे, तर जगातही आहे. भारताची अर्थव्यवस्था बळकट होत आहे. याच सकारात्मकता आणि सामर्थ्याचा उपयोग करून गतिशील विकास साध्य करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या देशात आधुनिक दळणवळणाकडे लक्ष दिले जात आहे. मुंबई हे महत्त्वाचे शहर आहे. त्याचबरोबर आगामी काळात मुंबईसह राज्यातील इतर शहरे देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे या शहरांच्या सर्वांगीण विकासाला आमचे प्राधान्य राहणार असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील सामान्य मुंबईकरांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचे त्यांनी कौतुक केले. मुंबईच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी दिली.
रेल्वेचे आधुनिकीकरण मिशन मोडवर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेची प्रवाशांना सुविधा मिळण्याबरोबरच, त्याच ठिकाणी बस, टॅक्सी आदी सुविधाही असाव्यात यासाठी मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी हब तयार करण्यात येणार असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.
केंद्राच्या पाठबळाने मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबई अधिक वेगाने धावू शकणार आहे. तीन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ आमच्यासोबत आहे.
सुवर्ण अक्षरात नोंद करावी असा दिवस
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईकरांचे जगणे सुसह्य करण्याची सुरूवात आहे. येत्या दोन वर्षांत त्याचा कायापालटही पहायला मिळेल आणि आजच्या दिवसाची सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशीच आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्याच हस्ते ऑक्टोबर 2015 मध्ये मेट्रोचे भूमिपूजन झाले होते आणि त्यांच्याच हस्ते आज उद्घाटनही होत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. म्हणूनच अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी प्रधानमंत्र्यांना आम्ही मुंबईत आमंत्रित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या समृद्धीची सुरूवात
गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये देशातल्या गेमचेंजर समृद्धी महामार्गाची सुरुवात झाली. आता नव्या वर्षाची सुरुवात आपण मुंबईकरांसाठी मेट्रो सुरु करीत आहोत. एक कार्यक्रम राज्याच्या उपराजधानीत झाला आणि आज राज्याच्या राजधानीत हा अभूतपूर्व सोहळा होतोय, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गामुळे राज्यात ‘समृद्धी’ दाखल होत आहे.
समृद्धी असो, मेट्रो असो किंवा येत्या नोव्हेंबरपासून सुरु होणारा समुद्रावरील सर्वात लांब मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आहे. आम्ही रस्ते, रेल्वे, सागरी मार्ग उभारून देशातला एक आदर्श असा वाहतूक आणि दळणवळण आराखडा जगासमोर ठेवत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये आम्ही मेट्रो ३ चा पहिला टप्पा सुरु करणार आहोत. ही मेट्रो लवकरच लाखो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. मुंबई महानगरात ३१४ किलोमीटर मेट्रोच्या निर्माण होणाऱ्या जाळ्यामुळे मुंबईतील ३० ते ४० लाख वाहने कमी होतील. वेळेची बचत होईल. प्रदूषण कमी होईल. कोस्टल रोडचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून नवी मुंबई मेट्रो लवकरच सुरु होईल, असेही ते म्हणाले.
विकासाला मानवी चेहरा देणार
गेल्या सहा महिन्यात आम्ही जे काम केले आहे, त्यावर मुंबईकर जनतेचा विश्वास आहे, आणि एकदा विश्वास टाकला की, मुंबईकर त्याची साथ कधीही सोडत नाही हा इतिहास आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले की, केवळ रस्ते, पूल बांधणे म्हणजे विकास नाही. विकासाला मानवी चेहरा पाहिजे. आज आम्ही आणखी एक स्वप्न सत्यात उतरवतो आहोत ते म्हणजे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करतोय. मुंबईतील सांडपाणी पुनर्प्रक्रिया, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सुशोभिकरण हे सर्वच आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे मुंबई हे खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होणार आहे.
मुंबईतील सगळ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला असून याचीही सुरुवात आज होते आहे. काँक्रिटीकरण केल्यानंतर किमान २५ वर्ष रस्ते सुस्थितीत राहतील. संपूर्ण मुंबईला खड्डेमुक्त करण्याच्या या निर्णयाला सर्वांनी पाठींबा दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सर्वसामान्य मुंबईकरांसाठी
मुंबईकर मुंबईच्या बाहेर जाऊ नये याला आमचे प्राधान्य आहे. सर्वसामान्य मुंबईकर माणसाला स्वस्तात घरे मिळाली पाहिजेत यासाठी घरांच्या विविध योजना आम्ही राबवित आहोत. पुनर्विकासाला गती आणतो आहोत, पोलिसांना, कामगारांना घरे देत आहोत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी धारावी पुनर्विकासाचे उदाहरण दिले.
यावेळी त्यांनी राज्य शासनाने सामाजिक भावनेतून घेतलेल्या निर्णयांविषयीही सांगितले. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणे, स्वतंत्र दिव्यांग विभाग, ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत, दिवाळीत शंभर रुपयांत शिधा, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुविधा संपन्न कुटुंब मिशन, चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा दुपटीने जास्त मदत असे अनेक निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
दावोस दौऱ्यात अनेक उद्योजकांबरोबर बैठका झाल्या. प्रत्येकाने प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्याबद्दल आदर व विश्वास व्यक्त केला. ते आमचे नेते व मार्गदर्शक आहेत याचा अभिमान तर आहेच, पण एक भारतीय म्हणून अभिमान वाटला असे सांगून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला मिळालेल्या गुंतवणुकीविषयी माहिती दिली.
राज्यातील विकासाला प्रधानमंत्री मोदी यांचे बळ – उपमुख्यमंत्री फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ज्या योजनांचे भूमिपूजन प्रधानमंत्री यांच्या हस्ते झाले, त्यांच्याच हस्ते या प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे. ही विकासाची बदललेली संस्कृती आहे.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेला मध्यंतरी खीळ बसली होती. पुन्हा राज्य शासनाने ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील एक लाखाहून अधिक फेरीवाल्यांना त्याचा लाभ होणार आहे. मुंबईच्या बाहेर राज्याच्या इतर भागातही आगामी काळात ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमामुळे मुंबईचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. धारावी येथील एक लाख लोकांचे पुनर्वसन करण्याचा प्रकल्प केवळ केंद्र सरकारने रेल्वे विभागाची जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.