काम पूर्ण करण्याची मुदत संपली तरी शिवपुरी रस्त्याचे काम अर्धवटच ! अक्कलकोटचे नागरिक संतप्त, पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
अक्कलकोट : अक्कलकोट शहरात अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मंगरुळे हायस्कूल ते शिवपुरी (बंजारा चौक) पर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून तब्बल ८ कोटी ३७ लाखांच्या या रस्त्याचे काम मुदत संपुनही सुरूच आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम नेमके पूर्ण होणार तरी कधी ? असा सवाल आता नागरिकांतून विचारला जात आहे.
राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ऑगस्ट २०२१ मध्ये नगराध्यक्ष शोभा खेडगी व अन्य पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून या कामाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रत्यक्षात सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन सोलापूर या कंपनीला काम देण्यात आले. आज घडीला काँक्रीट रस्त्याचे काम केवळ २२ टक्के झाले आहे. गटारीचे काम वगळता इतर कोणतेही कामे युद्धपातळीवर झालेली नाही. प्रत्यक्षात काम देखील अंदाजपत्रकापेक्षा १४.४० टक्के कमी दराने मंजूर झाले आहे. वास्तविक पाहता आता या कामाची मदत पण ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपली आहे. आता पुढे काय हा प्रश्न आहे.
या कामात गटार खोदकाम व बांधकाम, रस्ता दुभाजक,बाजूला दोन लेन, २५ मीटर रुंदीचा हा रस्ता आहे. त्याची लांबी ०.८१ किलोमीटर आहे. शिवपुरी, स्टेशन रोडकडे आणि जेऊरकडे जाणाऱ्यासाठी हा रस्ता महत्वाचा आहे. हजारो वाहने या रस्त्यावरून जातात. तालुक्याच्या दक्षिण भागाला जोडणारा रस्ता आहे. त्यात शिवपुरी हे एक तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे. या ठिकाणी परदेशातील भाविक ही येतात. अक्कलकोट रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहनाची गर्दी खूप असते.
सध्या मात्र अर्धवट कामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य व खड्ड्यांचा बाजार आहे. काम मंजूर होऊन त्याची मुदत संपली तरी हे काम पूर्ण होत नाही. या निष्काळजीपणाबद्दल अक्कलकोटकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या कामातील अडथळयाबाबत ठेकेदाराने पालिकेला अर्जही केला होता. त्याबाबत पालिकेने मे २०२१ मध्येच अडथळे दूर केल्याबाबतचे पत्रही दिले होते तरीही हे काम अर्धवट राहिले आहे आणि ते खूप धीम्या गतीने सुरू आहे. मुदत संपूनही काम सुरूच असल्याने आता पालिका काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
अडचणीमुळे विलंब झाल्याची चर्चा
रस्त्याबाबत चौकशी केली असता रस्त्यात अतिक्रमणे आणि इतर अडथळे खूप आहेत त्यामुळे काम संथगतीने सुरू आहे, असे सांगण्यात येते. पण ठेकेदार आणि पालिका याच्यामध्ये कुठेही समन्वय दिसून येत नाही. काम पूर्ण होण्याबाबत अजूनही ठोस पावले पडताना नाहीत. याबद्दल नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.