ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आंबेडकरांचा कॉंग्रेससह भाजपवर घणाघात ; माजी मुख्यमंत्र्यांना राज्यपालपदाची ऑफर

इचलकरंजी : वृत्तसंस्था

देशात येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना इचलकरंजी येथे प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने राज्यातील कॉंग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, काँग्रेसमधील एका माजी मुख्यमंत्र्यांना राज्यपालपदाची ऑफर देण्यात आली असून तुमचा एक मुख्यमंत्री गेला. दुसरा मुख्यमंत्री राहिलाय. त्यालाही अजेंडा देण्यात आला आहे. काय आहे तो अजेंडा? तर एकीमध्ये बिघाड करणे. एकीमध्ये बिघाड केला तर मे-जूनमध्ये कुठलातरी राज्यपाल म्हणून जाताल अशी ऑफर त्यांना देण्यात आली आहे. असे म्हणत काँग्रेसमध्ये असे अनेक सुपारीबहाद्दर आहेत, असा आरोप करत आंबेडकरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आमचा सल्ला आहे. आधी हे सुपारीबहाद्दर ओळखून काँग्रेसमधून फेकून द्या. तुमची काँग्रेस वाढायला सुरुवात होईल. या सुपारीबहाद्दरांना आवरलं नाही तर निवडणुकांनंतर तुम्ही जेलमध्ये जाल हे लक्षात ठेवा. काँग्रेसवाल्यांनो, तुम्हाला मी आव्हान करतो. तुम्ही भुरटे चोर आहात. त्या भुरट्या चोरीची कबुली द्या. लोक तुम्हाला माफ करतील, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आज काँग्रेसवाले आम्हाला सांगायला लागलेत की भाजपासमोर आपण लढले पाहिजे. आधी लढायला तर शिका आणि मग उपदेश द्या, असा टोला त्यांनी लगावला आहे. तर काँग्रेसवाल्यांना मी सुचवले की त्यांच्या पक्षाच्या महिला विंगच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर धरणे द्यावे. त्यांना एवढेच सांगावे की हिंदूंना एकत्र येण्याचा सल्ला तुम्ही देताय, तर आधी तुमच्यापासून सुरुवात करा. पती-पत्नी एकत्र राहायला शिका, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!