ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अमित साटमांचा उद्धव ठाकरेंवर ३ लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महानगरपालिका निवडणूक ही सध्या सर्वाधिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप, ठाकरे गट आणि शिंदे गटाने पूर्ण ताकद लावली असून, प्रचार जसजसा अंतिम टप्प्याकडे जात आहे तसतसे नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र होताना दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा उल्लेख “ठाकरे चाटम” असा केल्यानंतर राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला.

साटम म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी मला शिवी दिलेली नाही, तर प्रत्येक मराठी माणसालाच शिवी दिली आहे. हा मराठी माणसाचा अपमान आहे. मी सामान्य कुटुंबातून आलो असून कोणाच्या आशीर्वादाने नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आर्थिक आरोप करताना, ठाकरेंनी कोट्यवधी नव्हे तर तब्बल ३ लाख कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे,” असा खळबळजनक दावा केला. मुंबईतील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर बोट ठेवत साटम म्हणाले की, “गेल्या १० वर्षांत २१ हजार कोटी रुपये खर्च करूनही आज मुंबईत रस्ता आहे की खड्डा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत.”

कोरोना काळातील कारभारावरही त्यांनी आरोपांची झोड उठवली. महालक्ष्मी येथील कोविड सेंटर हे बिल्डरच्या फायद्यासाठी उभारण्यात आल्याचा आरोप करत, बॉडी बॅग, पीपीई किट यांसारख्या साहित्यांतही गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री असताना १७०० बार-रेस्टॉरंटकडून वसुली केल्याचाही आरोप साटम यांनी केला.

कोस्टल रोड प्रकल्पावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. “कोस्टल रोड आम्ही केला, असे ते म्हणतात; मात्र त्यांच्या काळात केवळ तारखाच ठरत होत्या. कोस्टल रोडचे खरे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे,” असा दावा करत साटम यांनी पुन्हा एकदा ३ लाख कोटींच्या कथित घोटाळ्याचा आरोप केला.

या आरोपांनंतर आता अमित साटम यांच्या टीकेला ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, मुंबई महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!