पुणे : वृत्तसंस्था
राज्यात लोकसभा निवडणूकीने वातावरण तापविले असतांना नुकतेच शिरुरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी 5 वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचे जाहीर केले आहे. राजकारण हा पार्टटाईम व्यवसाय नसून फुल टाईम सेवा करण्याचे क्षेत्र असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हंटले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमोल कोल्हे म्हणाले, ”मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर मला पूर्णवेळ काम करावे लागणार आहे. अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझे प्राधान्य आहे. त्यामुळे, अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही. गेल्या पंधरा वर्षांत मतदारसंघात प्रकल्प आले नाहीत. मात्र गेल्या पाच वर्षांत अनेक प्रकल्प आले”, असे अमोल कोल्हे म्हणाले.
पुढे अमोल कोल्हे म्हणाले, ” माझ्या या निर्णयामुळे चाहत्यांची निराशा होऊ शकते. मात्र शिरूरमधील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवायचे ठरवले आहे. मालिका विश्वात काम करत असताना पूर्ण वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी मी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे अमोल कोल्हेंनी स्पष्ट केले.
तसेच छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे एवढाच अपवाद राहिले, त्यामुळे या व्यतिरिक्त मी तुम्हाला स्क्रीनवर दिसणार नाही असे अमोल कोल्हे म्हणाले. काही दिवसांपूर्वीच एका अभिनेत्याला लोकसभा मतदारसघाचे किंवा जनतेचे प्रश्न काय समजणार, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना लक्ष केले होते. मात्र, आता अमोल कोल्हेंनी या सर्व टीकाकारांना आपल्या निर्णयाने गप्प केले आहे.