सिध्देश्वर साखर कारखाना ‘चिमणी’च्या समर्थनार्थ शेतकर्यांचा अभूतपूर्व महामोर्चा ; सोलापूरच्या इतिहासातील सर्वात मोठा लाँग मार्च
सोलापूर, दि. 19- कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना विरुध्द काही दुष्ट व भ्रष्ट राजकीय मंडळींचे चाललेले कपट कारस्थान उधळून कारखाना बचावसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी व कामगारांच्या महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सोलापूरच्या इतिहासातील हा सर्वात मोठा लाँग मार्च ठरला. मोर्चात सहभागी शेतकर्यांनी प्राण गेले तरी बेहत्तर पण कोणत्याही परिस्थितीत कारखान्याला धक्का लावू न देण्याचा निर्धार केला.
सोमवारी, कारखाना कार्यस्थळापासून होम मैदानापर्यंत निघणार्या या महामोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी, कामगार, महिला, ऊसतोड मजूर, ऊस वाहतूक चालक-मालक, कारखान्याचे हितचिंतक आदी कारखाना कार्यस्थळावर एकत्रित आले होते. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांच्या हस्ते कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर या महामोर्चाला सुरुवात झाली.
‘कारखान्याची चिमणी नियमित झालीच पाहिजे’, ‘हरित लवादाने कारखान्यास दिलेली अन्यायकारक नोटीस रद्द करावी’, ‘प्रशासनाने कारखान्यास दिलेल्या सर्व नोटिसा मागे घ्याव्यात’, ‘बोरामणी विमानतळ लवकरात लवकर चालू करा’, ‘बोरामणी विमानतळ कार्यान्वित होईपर्यंत होटगी रोड विमानतळ रन-वे क्रमांक 15 वरून विमानसेवा चालू करावी’ या मागण्यांचे फलक मोर्चेकर्यांच्या हातात होते. ‘कोण म्हणतं परवानगी देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही’, ‘चिमणी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, ‘कारखान्याविरुध्दचे षडयंत्र बंद करा’, ‘कामगारांची रोजीरोटी काढून घेणार्या प्रशासनाचा व सोलापूर विकास मंचचा धिक्कार असो’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, ‘बोरामणी विमानतळ झालेच पाहिजे’, ‘सोलापूर भकास मंच मुर्दाबाद’, ‘कामगारांवर अन्याय सहन करणार नाही’, ‘इन्क्लाब जिंदाबाद’, ‘धर्मराज काडादी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ या घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून गेला.
मोर्चामध्ये कारखान्याचे शेतकरी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, सर्व शेतकरी संघटना, माकप, राष्ट्रीय साखर कामगार युनियन, धनगर समाज, एमआयएम, रिपब्लिकन, मराठा समाज, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सोलापूर शहर, मोहोळ, अक्कलकोट, तुळजापूर या भागातील शेतकरी तसेच या लढ्यास पाठिंबा दिलेले ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतींचे सदस्य, विकास सोसायट्यांचे पदाधिकारी, विविध सेवाभावी संघटना, निवृत्त शिक्षक संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चात सहभागी शेतकर्यांनी लाल, पिवळे, निळे, हिरवे, पांढरे आणि भगवे झेंडे हाती घेऊन कारखान्यास धक्का लावाल तर रक्तपात होईल, असा इशारा प्रशासनास देत होते. कारखान्यावर वर्षांनुवर्षे रोजीरोटी अवलंबून असलेले ऊसतोड कामगारांनीही कारखाना बचावच्या लढ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
मोर्चा होम मैदानाकडे जात असताना कुमठे कॉर्नर आणि हत्तुरे वस्ती येथील नागरिकांनी मोर्चाचे नेतृत्व करणार्या धर्मराज काडादी यांचे फाटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. यावेळी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत समन्वय समितीचे राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी काडादी यांच्यावर पुष्पवृष्टी केली. मजरेवाडी, राघवेंद्र नगर येथील नागरिकांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली येऊन कारखान्याच्या समर्थनार्थ पाठिंब्याचे पत्र काडादी यांना दिले.
यावेळी अण्णाराव भोपळे, दादाराव ताकमोगे, नितीन ताकमोगे, विश्वनाथ शेवगार, विश्वनाथ चौगुले, विजयकुमार बकरे, नेताजी ताकमोगे, धीरज खंदारे आदी उपस्थित होते. माजी आमदार माने यांनीही आपल्या निवासस्थानासमोर मोर्चाचे स्वागत केले.
सात रस्ता येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते हातात तिरंगी झेंडे घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. रंगभवन येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला भगिनी कारखाना बचाव व चिमणीच्या समर्थनार्थ असलेले फलक हातात घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
सिध्देश्वर साखर कारखाना ते होम मैदान हे आठ किलोमीटरचे अंतर असून मोर्चाला सुरुवात झाली त्यावेळी मोर्चाचा पहिला टोक भाग्यश्री पार्क आणि शेवटचा टोक कारखाना स्थळ असे होते. हलग्यांचा कडकडाट आणि घोषणाबाजीने मोर्चाचा मार्ग दणाणून गेला होता. या शिस्तबध्द मोर्चामध्ये ऊस वाहतूक चालक-मालक ट्रॅक्टर ट्रॉलीसह सहभागी झाले होते.
या महामोर्चामध्ये सिध्देश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, अक्कलकोटचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार शिवशरण पाटील, विश्वनाथ चाकोते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे,राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल, शंकर पाटील, बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते, सिध्देश्वर बँकेचे अध्यक्ष प्रकाश वाले, अक्कलकोट राष्ट्रवादीचे दिलीप सिध्दे, स्वामी समर्थ साखर कारखान्याचे रमेश पाटील, अप्पासाहेब पाटील, बसवराज बाणेगाव, जि.प.चे माजी सदस्य मल्लिकार्जुन पाटील, आनंद तानवडे, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब मोरे, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिध्द म्हेत्रे, भीमाशंकर जमादार, काँग्रेसचे दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील, कुंभारीचे अप्पासाहेब पाटील, जि.प.चे माजी सभापती अप्पाराव कोरे, अशोक देवकते,धनेश आचलारे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, सुधीर लांडे, सिद्धेश्वर साखर कारखाना कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार यांच्यासह आदी मान्यवर सहभागी झाले होते.
‘चिमणी’ने वेधले लक्ष
विमानसेवेचे निमित्त पुढे करून सिध्देश्वर कारखाना बंद पाडण्याचे कुटील कारस्थान करणार्यांचा डाव उधळून टाकण्यासाठी हजारो शेतकरी या महामोर्चात सहभागी झाले होते. ‘सिध्देश्वर’ची चिमणी नियमित करावी, प्रशासनाने कारखान्यास दिलेल्या सर्व नोटिसा मागे घ्याव्यात, हरित लवादाची नोटीस रद्द व्हावी, बोरामणी विमानतळ लवकरात लवकर चालू करावे यासह अन्य मागण्यांसाठी निघालेल्या या महामोर्चातील एका ट्रॅक्टर ट्रॉलीवर 20 फूट उंच प्रतिकात्मक ‘चिमणी’ उभारण्यात आली होती. त्यावरील ‘चिमणी बचाव’ हे घोषवाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.