बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली असून जिल्हा रुग्णालयातील अमानवी वागणुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. उपचारासाठी आलेल्या एका वयोवृद्ध आजारी महिलेला सोनोग्राफी सेंटरच्या दाराबाहेर झोपवून कर्मचारी निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आजी जिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर उपचारासाठी दाखल होत्या. डॉक्टरांनी त्यांना सोनोग्राफीसाठी पाठवले होते. मात्र रुग्णालयाची लिफ्ट बंद असल्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्ट्रेचरच्या साहाय्याने त्यांना खाली आणले. सायंकाळी सहा वाजण्यापूर्वीच या आजी सोनोग्राफी सेंटरसमोर पोहोचल्या होत्या.
असे असतानाही, संबंधित महिला कर्मचारीने पावणे सहा वाजताच सेंटरचा दरवाजा बंद केला. दारासमोर आजारी आजी खाली झोपलेल्या असतानाही कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. यानंतर नातेवाईकांनी जाब विचारला असता संबंधित महिलेने उर्मटपणे बोलत, आजी समोर असतानाच तेथून निघून जाणे पसंत केले.
या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “रुग्णालयात माणुसकी मेली आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या परिचारिकेसह संबंधित डॉक्टरांची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी दिली आहे.