अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
युद्धनीती,व्यूहरचना दूरदृष्टी, बुद्धिमत्ता, धाडस, रणनीती आणि शिस्त यासारख्या विविध पैलूंनी शनिवारी ‘चाणक्य’ महानाट्य प्रयोगातून दीड हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास उलगडून दाखविला गेला.यात कलाकारांच्या हुबेहूब अभिनयाने तर अक्कलकोटकर अक्षरशः इतिहासात बुडून गेले.येथील प्रियदर्शनी सभागृहात विवेकानंद प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेचे सहावे आणि शेवटचे पुष्प ‘चाणक्य’ या नाट्यप्रयोगाने गुंफले गेले.प्रारंभी श्री गणरायाला वंदन करून श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समर्थ सहकारी बँकेचे संचालक प्रशांत बडवे,मल्लिनाथ स्वामी,गुरू वठारे,चंद्रकांत दसले,संदीप सरवदे आदी उपस्थित होते.
‘चाणक्य’ हे नाटक चाणक्य उर्फ कौटिल्य उर्फ विष्णुगुप्त या पात्राभोवती फिरते, एक शिक्षक, एक बहुपयोगी ज्याने ईसापूर्व ३२० ते ३२६ च्या सुमारास अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते. चाणक्य आपली दूरदृष्टी, बुद्धिमत्ता, धाडस, रणनीती आणि शिस्तीने आपला धाडसी,करिष्माई विद्यार्थी चंद्रगुप्त मौर्याचा हात धरून त्याला मगध साम्राज्याच्या सिंहासनावर बसवून आपली निःस्वार्थी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने कसा वाटचाल करतो हे या नाटकात दाखवण्यात आले आहे.समकालीन राजकीय,सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक रचनेचे विलक्षण चित्रण कथेत उलगडत असताना समोर येते.इ.स.पूर्व ३२० च्या कालखंडातील गोष्ट ‘चाणक्य’मधून प्रेक्षकांसमोर आली आहे.या नाटकाचे मूळ लेखक मिहिर भुता असून त्याचा मराठी अनुवाद शैलेश दातार यांनी केला आहे.
त्यांनी हिंदी ‘चाणक्य’मध्ये कामही केले आहे.मगध, तक्षशिला,राजाचा दरबार,जंगल,किल्ला, नेपाळचा काही भाग अशी विविध लोकेशन्स यामध्ये अंतर्भूत करण्यात आली होती.‘चाणक्य’ हा विषय म्हटल्यावर, अपमानामुळे क्रोधित झालेल्या चाणक्य यांनी शेंडीला गाठ न मारण्याची केलेली प्रतिज्ञा,इथवर मर्यादितच माहिती लोकांना आहे.परंतु, चाणक्यांचा खरा इतिहास, चाणक्यनीती नेमकी काय होती, त्या काळातील भाषा हे नाटक पाहिल्यानंतर लक्षात येते, असे नाटकाच्या टीमचे म्हणणे आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते मल्लिनाथ कल्याणशेट्टी, मल्लिनाथ साखरे,नीलकंठ कापसे,अशोक येणेगुरे,प्रा.भिमराव साठे,प्रा.किशोर थोरे,मल्लिकार्जुन मसूती,सुनील गोरे,बाळा शिंदे आदींची उपस्थिती होती.सलग दोन दिवस नाट्यप्रयोगाने व्याख्यानमालेचे पुष्प गुंफले गेल्याने नाट्य रसिकांची मोठी गर्दी दिसून आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिगंधा कोळी यांनी केले तर आभार खंडेराव घाटगे यांनी मानले.