अक्कलकोट ; प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत श्री गुरुपौर्णिमेनिमित्त व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त भरगच्च अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम हे लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरले. नेटक्या नियोजनामुळे स्वामी भक्तांसह अक्कलकोट करांचे अन्नछत्र मंडळातील सर्वच कार्यक्रम आकर्षण ठरले.
राज्यातील धार्मिक क्षेत्रात नियोजनबध्द मांडणी आणि आखणी असलेल्या सामाजिकतेच्या बरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनिय व नेत्रदीपक प्रगतीची वाटचाल करीत असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३७ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक या कार्यक्रमाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष होते. दि. ११ जुलै ते २१ जुलै २०२४ पर्यंत अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते.नक्षत्रांचे देणे, थोर संगित दिग्दर्शक व गायक पद्मश्री पंडीतजी ह्रदयनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर आणि सहकारी मुंबई, ‘एक भाव मैफिल’ स्वर आर्या लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते आर्या आंबेकर व सहकलाकार मुंबई , आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडीयेला’ (खेळ, किस्से, गप्पा, साऱ्या कुटुंबासाठी) परमपूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या शुभाशिर्वादाने सादरकर्ते कर्नाटकचे ख्यातनाम गायक राजेश कृष्णन व Zee कन्नड वाहिनीच्या प्रसिध्द निवेदिका अनुश्री आणि सहकारी बेंगळूर यांचा ‘संगीत संजे’ कन्नड कार्यक्रम, ख्यातनाम व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान , ‘किर्तन’ राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) महाराष्ट्राचे हास्य जत्रा सादरकर्ते समीर चौगुले, ओंकार राऊत, ईशा डे, प्रसाद खांडेकर, चेतन भट, अरुण कदम, प्रभाकर मोरे, वनित खरात, नम्रता संभेराव, शाम राजपूत, पृथ्वीक प्रताप यांचा धमाल उडवणारा कार्यक्रम ,‘स्वर संध्या’ सादरकर्ते – महेश काळे आणि सहकारी, पुणे ‘भक्तिरंग’ भक्तिगीते, भावगीते व नृत्य सादरकर्ते संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार पुणे , श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सुर भक्तीचे उमटले’ भक्ती संगीत आदी कार्यक्रम स्वामी भक्ताचें तसेच अक्कलकोटकराचें आकर्षण ठरले. या सर्वच कार्यक्रमानां रसिक श्रोते स्वामी भक्तानीं भरभरून प्रतिसाद दिला. अन्नछत्र मंडळातील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी अबालवृद्धाचीं गर्दी झाली होती.दि. २१ जुलै रोजी रविवार सकाळी ११ वा. गुरूपौर्णिमे निमित्त नियोजित ५ मजली भव्य अशा महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन समारंभ राज्य अधिस्वीकृती समिती, महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष व दै.लोकमत, मुंबईचे सहयोगी संपादक यदुभाऊ जोशी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, कायदेविषयक सल्लागार व जेष्ठ विधिज्ञ अँड. नितीन हबीब सोलापूर, अखिल मंडई मंडळ पुणेचे अध्यक्ष व न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात, कैलास वाडकर (देणगीदार व पालखी संयोजक शिरवळ, पुणे), अतुल शिंदीकर (देणगीदार, ठाणे प.) यांच्या हस्ते आणि अतिथींच्या उपस्थितीत संपन्न झाले.नियोजित महाप्रसाद गृहाची इमारत, भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की, एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सदर इमारतीचे बांधकाम करण्याची पुर्वतयारी झाली असुन, ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार आहे. या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका अपेक्षित आहे.
दि. २१ जुलै रोजी रविवार सायं ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या भव्य मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात आणि अतुल बेहरे पुणे यांच्या ‘नांदब्रम्ह’ या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ करण्यात आला. अन्नछत्र मंडळाच्या पालखीची मिरवणूक पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. दि. ११ जुलै ते २० जुलै दरम्यान गुणीजन व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार व सत्कार हे सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.अशा विविध कार्यक्रमांमुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापन दिन हा सर्वांचा चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजयराजे भोसले व कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांचेच लक्षवेधी ठरले. या कार्यक्रमासाठी अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे उपाध्यक्ष अभय खोबरे व सर्वच विश्वस्त सभासद सेवेकरी यांचे बहुमोल असे सहकार्य लाभले.