ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काशीपीठाच्या वीरशैव मंगल कार्यालयात कोविड सेंटर, 5 स्वतंत्र रूमसह 170 बेडची व्यवस्था

सोलापूर : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मंगळवेढा येथील श्री. काशिविश्वेश्वर सांस्कृती भवन संचलित वीरशैव मंगल कार्यालय कोविड सेंटरसाठी दिली असल्याची माहिती काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली.

शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवेढा येथील श्री काशिविश्वेश्वर संस्कृती भवन संचलित वीरशैव मंगल कार्यालय कोविड सेंटरसाठी देण्याची मागणी काशीपीठाकडे केली.

यासंदर्भात तहसीलदार स्वप्निल रानडे यांच्या सूचनेनुसार तलाठी उमेश सूर्यवंशी यांनी सदर मंगल कार्यालयाच्या मागणीचे पत्र मंगल कार्यालय व्यवस्थापनाकडे दिले. प्रशासनाचे हे पत्र कार्यालय व्यवस्थापनाने काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांना पाठविले.
मानव धर्माच्या कल्याणासाठी आजपर्यंत काशीपीठाकडून अनेक उपक्रम राबविले आहेत. गेल्या वर्षीही कोविड सेंटरसाठी सदर मंगल कार्यालय देण्यात आले होते. त्यामुळे याहीवर्षी आम्ही त्यांच्या मागणीस तात्काळ होकार दिला असेही डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी पुढे म्हणाले.

श्री काशिविश्वेश्वर संस्कृती भवन संचलित वीरशैव मंगल कार्यालय येथे 10 हजार स्क्वेअर फुट आकाराच्या हॉलमध्ये सध्या 170 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याच ठिकाणी 5 हजार स्क्वेअर फूट आकाराचा आणखी एक हॉल आहे. त्या ठिकाणीही आणखीन शंभर बेडची उपलब्धता होऊ शकते. तसेच 5 स्वतंत्र रूम असून त्या ठिकाणीही कोरोनाबाधित रुग्णांची सोय करता येऊ शकते. काशीपीठातर्फे कोविड सेंटरसाठी वीज, पाणी, स्वच्छतागृह आणि शौचालय याची सोय करून देण्यात आली आहे.
काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आज्ञेनुसार व्यवस्थापक भरत उंबरकर, सुधाकर हलगणे आणि चेतन पाटील यांनी मंगल कार्यालय उपलब्ध करून देत असल्याचे लेखी पत्र तहसीलदार स्वप्निल रावडे यांना सुपूर्द केले.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील सुमारे तीनशे कोरोनाबाधित रुग्णांची सोय याठिकाणी होणार आहे. अशा संकटसमयी काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दाखविलेल्या औदार्याबद्दल शहर तालुक्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!