ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्योगपती टाटांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या; मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर

मुंबई : वृत्तसंस्था

देशाचे उद्योगपती रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना ‘भारतरत्न’ देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव आज दि.१० राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला.

ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज (दि.१०) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हादेखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत श्री. टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे. टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समुहाचा कारभार अनेक वर्ष पाहिला. देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!