माती परीक्षणाबद्दल ग्रामीण भागात जनजागृती आवश्यक : आयएएस ज्ञानेश्वर पाटील; कुरनूर येथे शेतकऱ्यांसाठी कृषी परिसंवाद कार्यक्रम
अक्कलकोट, दि.१ : ग्रामीण भागातील शेतकरी हे नेहमी पारंपारिक शेती करतात त्यांनी जर माती परीक्षण करून अभ्यासपूर्ण शेती केली तर वार्षिक उत्पन्नात भरघोस वाढ होऊ शकते त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन मध्य प्रदेशचे वित्त विभागाचे सचिव ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.
माजी सरपंच स्व.भालचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुरनूर (ता.अक्कलकोट ) येथे आयोजित कृषी परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकरी हे आधुनिक शेती बद्दल अजूनही म्हणावे तसे जागृत नाहीत त्यामुळे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग पाहायला मिळत नाहीत ग्रामीण भागात होणारे कृषी परिसंवाद शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत त्याचा लाभ घेऊन पीक पद्धतीत बदल करून शेतकऱ्यांनी आपले वार्षिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे म्हणाले, उसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी पाच मुद्दे लक्षात ठेवावेत. नेहमी माती परीक्षण, खत व्यवस्थापन ,पाण्याचे सुयोग्य नियोजन, कीड व्यवस्थापन आणि पट्टा पद्धतीने उसाची लागवड करावी.ज्यावेळी उसाचे बेणे आपण घेतो त्यावेळी प्रक्रिया करून लागवड करावी म्हणजे एकरी उसाच्या उत्पादनात वाढ होऊ शकते, असे ते म्हणाले.
यशस्वीनी उद्योग समूहाच्या अनिता माळगे म्हणाल्या, बोरामणी सारख्या ग्रामीण भागात महिला बचत गटाच्या माध्यमातून कृषी क्रांती झाली आहे.ज्वारी,कांदा या सारख्या पिकातून निरनिराळे उत्पादने आम्ही जगासमोर आणली आणि त्याला राज्यात बाजारपेठ मिळवून देण्याचे काम केले अशाच पद्धतीचे काम या परिसरातील बचत गटाच्या महिलांनी देखील करावे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच अमर पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर जगताप यांनी केले.
यावेळी सेवानिवृत्ती निमित्त स्वामीराव सुरवसे व नारायण मोरे यांचा पाटील परिवाराच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे, सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मोहन चव्हाण,पत्रकार नारायण चव्हाण, राजू बिराजदार,सुभाष येणेगुरे, पांडुरंग बंडगर, बापूराव सुरवसे, संजय मोरे, बाबासाहेब पाटील, काशिनाथ काळे, जिंदा पठाण, परशुराम बेडगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी मानसिकता बदलण्याची गरज
आजकाल शेती हा विषय तोट्याचा होऊ लागला आहे यात जर नफा मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. यासाठी आम्ही दरवर्षी कृषी परिसंवादासारखे कार्यक्रम आयोजित करत आहोत. त्याचा लाभ या परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा – अमर पाटील,माजी सरपंच