ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजप-राणा संघर्षात बच्चू कडूंची एन्ट्री, कौतुकानेच टोलेबाजी

अमरावती वृत्तसंस्था : अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण प्रचंड तापले असून भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षामध्ये थेट संघर्ष उफाळून आला आहे. रवी राणा यांनी तब्बल 32 जागांवर उमेदवार उभे करत भाजपची रणनीतीच बिघडवली असून निवडणूक चुरशीची झाली आहे.

भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उघडपणे प्रचारात उतरत भाजपला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे हा संघर्ष किती टोकाला गेला आहे, हे स्पष्ट झाले आहे. या राजकीय धामधुमीत आता प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनीही उडी घेतल्याने राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.

कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी यावेळी रवी राणा आणि नवनीत राणा यांचे तोंडभरून कौतुक करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. “वेळप्रसंगी रवी राणा समोर आले तर शाल देऊन त्यांचा सत्कार करेन,” असे विधान करत कडूंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. काहींना हे कौतुक राजकीय चिमटा वाटत असतानाच, अमरावतीत नेमकं काय घडतंय, असा प्रश्न मतदारांसह उमेदवारांनाही पडला आहे.

बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या भूमिकेचेही विशेष कौतुक केले. “नवनीत राणा भाजपमध्ये असल्या तरी पतीसाठी त्या उभ्या राहिल्या आहेत. पतिव्रतेचा धर्म त्यांनी निभावला आहे. पतीच्या विरोधात कोणी उभं राहिलं, तर हिंदू शेरनी भाजपविरोधातही दंड थोपटू शकते, हे त्यांनी दाखवून दिलं आहे,” असा टोला कडूंनी भाजपला लगावला.

भाजपवर हल्लाबोल करताना बच्चू कडू म्हणाले, “भाजपला नुकसान महत्त्वाचं नाही, त्यांना नवनीत राणा महत्त्वाच्या आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही रवी राणा शिवाय भाजपची दाढ शिजत नाही. अचलपूरमध्ये भाजपचे चार नगरसेवक पडले, हीच रवी राणांची ताकद आहे.” वेळ आल्यास रवी राणांचा शाल देऊन सत्कार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोवरही बच्चू कडूंनी टीकेची झोड उठवली. “तो रोड शो नव्हता, फक्त शो होता. माणसं नव्हती, फक्त पोलीस आणि आमदार होते. असा भंगार शो कुठे झाला नाही,” अशी टीका करत नवनीत राणा भाजपच्या नेत्यांना धडा शिकवणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप, राणा दाम्पत्य आणि आता बच्चू कडू यांच्या भूमिकेमुळे राजकीय गणिते पूर्णपणे बदलली असून, ही लढत अधिकच रंगतदार होत चालली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!