सोलापूर : प्रतिनिधी
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून, १६ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते ६ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये छाननी समितीने सवलत दिलेली शस्त्रे परवानाधारक वगळता सर्व शस्त्रे जवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी हे आदेश पारित केले आहेत.
निवडणुकीच्या कालावधीमध्ये विशेषतः मतदानाच्या आणि मतमोजणीच्या दिवशी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेने पार पाडण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडून मिळालेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले. या आदेशाचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असे सूचित करण्यात आले आहे.