मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बाजारात जाणाऱ्या महिलांना महागाईचा फटका बसत आहे. सणासुदीत भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले असून नवरात्रीमुळे फुलांचा बाजारही तेजीत आला आहे. फळ बाजारात दर कमालीची दरवाढ झाली असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. फळभाज्यांची आवक वाढली असली तरी मागणीही जास्त असल्याने टोमॅटो, कोबी, शिमला मिरची, शेवगा आणि मटारच्या दरात लक्षणिय वाढ झाली आहे. इतर फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
ग्रामीण भागातून आलेल्या भाजापाल्याला चांगला भाव मिळत असला तरी त्याचा फटका मात्र ग्राहकांना बसत आहे. आवक वाढली असली तरी मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर, करडई, मुळा आणि राजगिऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. नवरात्रातील उपवासामुळे राजगिरा भाजीला मागणी वाढली आहे. मेथी, शेपू, कांदापात, पुदिना, अंबाडी, चुका आणि पालकाचे दर स्थिर आहेत.
पालेभाज्यांचे शेकड्यातील दर
कोथिंबीर : 1000-1500, मेथी : 800-1000, शेपू :500- 800, कांदापात: 800-1200, करडई : 400- 700, पुदिना 500-800, मुळा : 800-1500, राजगिरा : 400- 800, चुका : 500-800, पालक : 800-1500 रुपये दराने मिळत असल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे.
फळेही महागली
नवरात्रातील उपवासामुळे फळांना मागणी वाढली असून चिकू, सफरचंद, पपई आणि डाळिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सीताफळ, अननस, मोसंबी, संत्री, पेरू आणि लिंबाचे दर स्थिर आहेत.
नवरात्रामुळे फुलांना मागणी
फुलबाजारात फुलांची आवक घटली आहे. नवरात्रामुळे फुलांना मागणी असून दर वाढले आहेत. फुलांचे प्रतिकिलोचे दर : झेंडू: 10-50, गुलछडी (सुट्टी) 150-250, ॲस्टर जुडी : 20-30, सुट्टा : 100-150, शेवंती : 40-200, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 20-30, गुलछडी काडी : 15-50, डच गुलाब (20 नग) : 50-100, जर्बेरा : 20-40, कार्नेशियन : 100-150, शेवंती काडी : 100-200, लिलियम (10 काड्या) 800-1000, ऑर्किड 300-500, जिप्सोफिला 50-60, जुई 700-1000 रुपये.