नाशिक : वृत्तसंस्था
लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते राज्यात प्रचार करीत आहे. यात पंतप्रधान मोदींची देखील सभा होत असून आज नाशिकमध्ये देखील सभा होत आहे. पण या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांच्या वतीने उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. तसेच प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईचा विरोधी पक्षांनी विरोध केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक मध्ये होत असलेल्या सभेपूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. केंद्र सरकारच्या कांदा धोरणाविरोधात हे शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत होते. या प्रकरणात पोलिसांनी अनेकांना स्थानबद्ध केले असल्याची माहिती समोर आली आहे. मोदींच्या सभेनंतर या सर्वांना सोडण्यात येईल, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे रोजी पिंपळगाव बसवंत येथे दुपारी 2 वाजता सभा घेणार आहेत. ती झाल्यानंतर मोदी दुपारी साडेचार वाजता मुंबईत पोहोचतील. मुंबईत दुपारी 4.30 वाजता रोड शो करून कल्याणला सभा घेणार आहेत. भिवंडीतील भाजप उमेदवार, कपिल पाटील आणि कल्याणचे शिंदेसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ही सभा होईल. तत्पूर्वी त्यांची घाटकोपर (प.) एलबीएस रोड येथून सुरू होणारा त्यांचा रोड शो पार्श्वनाथ जैन मंदिर घाटकोपर (प.) येथे संपेल. त्यात त्यांच्यासोबत राज्यातील महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.