मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी अनेक दौरे करीत आहे. सध्या सहाव्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून सुरुवात होत असून जरांगे यांचा हा 4 दिवसीय दौरा असून या दौऱ्यात ते गोदापट्ट्यातील 11 तालुक्यातल्या 123 गावांना भेटी देणार आहेत. तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील या 123 गावांना भेटी देऊन मुंबई आंदोलनाबाबत मार्गदर्शन देखील करणार असल्याची माहिती आहे.
या दौऱ्यापूर्वी बोलतांना जरांगे म्हणाले की, “आजपासून या दौऱ्याला सुरवात होत असून, या दौऱ्यात सभा होणार नाहीत. मुंबईला जाण्याशिवाय आता पर्याय नाही. आज कॅबिनेटची बैठक होणार आहे. सरकार निर्णय घेऊ शकते. मराठा समाजाच्या 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्यामुळे सरकारने मराठ्यांचा आंदोलन गांभीर्याने घेतले पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. तुम्ही 20 जानेवारीची वाट बघू नका, 20 जानेवारीनंतर तुमची आमची चर्चा बंद होणार असल्याचा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
यावेळी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. “तुला जर ओबीसीचे वेड लागले असते, तर धनगर बांधवांच्या आरक्षणावरती स्पष्ट भूमिका घेतली असती. तुला केसेस मागे घेण्याचे, राजकारणात मोठ-मोठे पद घ्यायचे वेड लागलेले आहे. तुला फक्त स्वतःच्या स्वार्थाचे वेड लागलंय,” अशी टीका जरांगे यांनी केली आहे.
पुढे बोलतांना जरांगे म्हणाले आहे की, “ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यापैकी काही लोकांचे कुणबी प्रमाणपत्र अजून देण्यात आल्या नाहीत. बीड जिल्ह्यात 13 हजार नोंदी मिळून आल्या आहेत. मात्र केवळ एक हजार प्रमाणपत्र देण्यात आलेत. त्यामुळे, आजच्या कॅबिनेटमध्ये त्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे, असे जरांगे म्हणाले.