ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूर धरणालगतच्या बेकायदा मांगुर प्रकल्पावर अखेर कारवाई, पाच जणांवर गुन्हे दाखल

 

अक्कलकोट, दि.३० : कुरनूर धरणालगत सुरू असलेल्या बेकायदा मांगुर प्रकल्पाप्रकरणी गुरुवारी पाच
जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत तर आजपासून हा प्रकल्प उध्वस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.पोलीस
प्रशासन,अक्कलकोट नगरपालिका,महसूल विभाग,मत्स्य विभाग आणि पाटबंधारे विभागाच्यावतीने संयुक्तिक ही कार्यवाही होणार असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब शिरसट आणि पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी बैठकीनंतर बोलताना दिली.गेल्या दोन दिवसांपूर्वी कुरनूर धरणालगत असलेल्या शेततळ्यात बेकायदा प्रकल्प उभारून मांगुर जातीच्या माशाचे उत्पादन घेत असल्याची तक्रार करण्यात आली होती.त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे.तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांच्या अध्यक्षतेखाली आज तहसील कार्यालयात पाटबंधारे विभाग,पोलीस प्रशासन, नगरपालिका, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली.
या बैठकीमध्ये कठोर कारवाई करण्याचा निर्णय झाला असून आज पोकलेनद्वारे सर्व शेततळे उध्वस्त करून त्यातील सर्व मांगुर मासे नष्ट करून जमिनीमध्ये गाडणार असल्याचे पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.

याप्रकरणी अकील काझी,शकील काझी,मैनुद्दीन पटेल (रा.सोलापूर ) बाले कोंढयालू,सईद राजू (रा.हैद्राबाद ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त राजकुमार महाडिक यांनी दिली.या बैठकीला मुख्याधिकारी सचिन पाटील,पंचायत समितीचे सभापती आनंदराव सोनकांबळे, कुरनूर धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे,माजी सरपंच अमर पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील,पाटबंधारेचे कालवा निरिक्षक प्रशांत लोंढे,भारत सुरवसे यांच्यासह सुरवसे वस्तीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!