ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आरक्षणाच्या नावाने केवळ भुलथापा : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला असतांना सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभिमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही अद्याप आरक्षण मात्र दिलेले नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत. मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाने केवळ भुलथापा देण्यात आल्या त्यामुळेच मराठा समाजाला मुंबईत यावे लागत आहे, हे शिंदे-भाजपा सरकारचे मोठे अपयश आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, आरक्षण प्रश्नावर शिंदे-भाजपा सरकारचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शिंदे-भाजपा सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारच्या प्रतिनिधींनी अनेकदा चर्चा करुन आश्वासन दिले. सरकारचे दोन मंत्री सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात होते, पण आता हे दोन मंत्री मागील काही दिवसांपासून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना दिसत नाहीत. हे मंत्री आता चर्चा का करत नाहीत? आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिली होती, ती मुदत संपली, त्यानंतर सरकारने दिलेली तारीखही संपली परंतु अद्याप आरक्षणाचा निर्णय काही झालेला नाही. सरकार मराठा समाजाला केवळ तारीख पे तारीख देत असून हा मराठा समाजाचा घोर अपमान आहे.

नाना पटोले म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “सत्ता आल्यास एका महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देतो आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची हिम्मत फक्त फडणवीसमध्येच आहे”, अशा वल्गना केली होती, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत कटकारस्थान करून भाजपाने सत्ता मिळवून आज दीड वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. फडणवीस यांची ती राणा भिमदेवी थाटात केलेली गर्जना कुठे गेली? देवेंद्र फडणवीस व भाजपा मराठा आरक्षणावर आत्ता गप्प का? मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनीच दिले होते, असा प्रचार करणारे भाजपाचे पोपटही मराठा आरक्षणावर गप्प आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!