ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काँग्रेसला मोठा धक्का; शहराध्यक्ष 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये जाणार

अंबरनाथ वृत्तसंस्था : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचारानेही चांगलाच वेग घेतला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये तिकीट न मिळाल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी नाराज इच्छुकांकडून पक्षाच्या सभांमध्ये गोंधळ घालण्यात येत आहे, तर काही ठिकाणी नेत्यांच्या वाहनांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

याचदरम्यान, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू झाले असून, सर्वाधिक ‘इनकमिंग’ भाजपमध्ये होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. अंबरनाथ काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील हे आपल्या तब्बल १२ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकीपूर्वी होणारा हा पक्षप्रवेश काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

या संदर्भात बोलताना प्रदीप पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ब्लॉक अध्यक्ष पदासाठी एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप पाटील यांनी केला आहे. याशिवाय, अंबरनाथमधील युतीसंदर्भात आम्ही पक्षाच्या वरिष्ठांना माहिती दिली होती, तरीही आमच्यावर कारवाई करण्यात आली, हे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने निवडणुकीदरम्यान एकदाही आम्हाला विचारले नाही, आम्ही आमच्या ताकदीवर निवडून आलो आहोत, असा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे अंबरनाथमधील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्येही इतर पक्षांतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले होते. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावरही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. मात्र, या जोरदार ‘इनकमिंग’मुळे भाजपमधील तिकीट न मिळालेल्या इच्छुकांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही चित्र स्पष्ट होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!