सोलापूर प्रतिनिधी : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीतील अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत थेट एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून खासदार प्रणिती शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असलेल्या फिरदोस पटेल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान आपल्याशी अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष फारूख शाब्दी आणि निरीक्षक अन्वर सादात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
फिरदोस पटेल या खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. 2017 मध्ये त्या सोलापूर महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. विशेष म्हणजे काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरही त्यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. फिरदोस पटेल या एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांच्या नातेवाईक असून, त्यांच्या मध्यस्थीनेच हा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. 102 जागांपैकी काँग्रेसला 45, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 30, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 20 आणि माकपला 7 जागा देण्याचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. शिवसेना शहरप्रमुख अजय दासरी यांनी या निर्णयाची घोषणा करत येत्या 4 तारखेला प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचे स्पष्ट केले. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पक्षांतर हा महाविकास आघाडीसमोर नवे आव्हान उभे करणारा ठरणार आहे. आता सोलापुरातील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.