मुंबई वृत्तसंस्था : राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली घडत आहेत. प्रचारसभा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच सत्ताधारी पक्षात इनकमिंग-आऊटगोईंगला वेग आला आहे. अशातच मुंबईतील मनसेचे ज्येष्ठ नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे संतोष धुरी मनसेला रामराम ठोकण्याची शक्यता असल्याने खळबळ उडाली आहे. संतोष धुरी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला असून, यावर त्यांनी स्वतः प्रतिक्रिया देत आपली नाराजी उघड केली आहे.
मंगळवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संतोष धुरी म्हणाले, “माझी कदर करण्यात आली नाही,” असे खळबळजनक विधान करत त्यांनी मनसेतील नाराजी स्पष्ट केली. मात्र, “मी अजिबात नाराज नाही,” असे सांगत त्यांनी आपल्या निर्णयाबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. “दुपारनंतर माझा राजकीय निर्णय मी जाहीर करेन. महानगरपालिका निवडणुकीत तिकीट मिळाले नाही म्हणून मी नाराज असण्याचा प्रश्नच येत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
धुरी यांनी भाजपमधील हालचालींबाबत माहिती देताना सांगितले की, “गेल्या दोन दिवसांत मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझी आगामी राजकीय दिशा मी आज दुपारी स्पष्ट करेन.” त्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचेही उघड केले. “माझ्यासोबत नितेश राणे होते. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ भेट दिली, मला बंगल्यावर बोलावून घेतले. त्यांनी माझी कदर केली, त्यामुळे मला बरं वाटलं,” असे धुरी म्हणाले.
नितेश राणे यांनी विशेषतः सिंधुदुर्गावरून मुंबईत येऊन भेट घेतल्याचा उल्लेख करत धुरी म्हणाले, “त्यांना माझ्यात काहीतरी वाटलं असेल. म्हणून ते आले, भेटले आणि नंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊया असे सुचवले. जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे मला चांगलं वाटलं.”
दरम्यान, “तिकीट हा मुद्दा नाही. माझी राजकीय भूमिका मी दुपारनंतर नक्की जाहीर करेन. मला थोडा वेळ द्या,” असे सांगत संतोष धुरी यांनी आपला निर्णय खुला ठेवला आहे. राज ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे नेते भाजपच्या वाटेवर असल्याने मनसेला हा मोठा धक्का मानला जात असून, महापालिका निवडणुकीआधी राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलताना दिसत आहेत.