पुणे : वृतसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे राज्यभर दौरे सुरु असतांना सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच अजित पवारांनी मोठी कबुली दिली आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन आम्ही मोठी चूक केली, अशी स्पष्ट कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी दिली. राजकारण हे पार घरामध्ये शिरू द्यायचे नसते. पण त्या बाबतीत माझ्याकडून काहीशी चूक झाली, असे ते म्हणालेत. त्यांच्या या कबुलीनंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा कूस बदलते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून आव्हान दिले होते. सुनेत्रा या अजित पवार यांच्या पत्नी होत्या. त्यामुळे नणंद भावजयीमधील या सामन्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. त्यात सुप्रिया यांनी सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव केला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन आपण मोठी चूक केल्याचे विधान केले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत माझ्याकडून एक चूक झाली. बारामती लोकसभा मतदारसंघात माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभे करण्याची काहीच गरज नव्हती. पण तसे केले गेले. पक्षाच्या संसदीय मंडळाने तो निर्णय घेतला होता. त्यामुळे एकदा बाण सुटला की आपण काहीच करू शकत नाही. पण राजकारण पार घरात शिरू द्यायचे नसते. आज माझे मन मला हे सांगत आहे. तसे व्हायला नको होते.